‘लायकी’ काढा, व्यसन सुटेल…फेसबुकचा अक्सीर इलाज!

सोशल नेटवर्क किंवा सोशल मीडिया म्हणजे तरुणाईचे फॅड असे मानणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र बघता बघता गेल्या काही वर्षांत फॅड सर्वच वयोगटात पसरले आणि जी ती व्यक्ती सोशल मीडियाच्या आहारी गेली. ही लाट समाजात टिकण्यासाठी आली आहे, हे लवकरच सर्वांना समजून चुकले. या सोशल मीडियाचा दादा म्हणजे फेसबुक आणि फेसबुकवरील वापरकर्त्यांची सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे लाईक्स!

वापरकर्त्यांच्या पोस्टवरील ‘‘लाईक्स’’ची संख्या लपवणार आहोत, असे फेसबुकने जाहीर केले. एक प्रयोग म्हणून हे पाऊल सर्वात आधी ऑस्ट्रेलियात उचलण्यात आले आहे. जगभरात वाढत असलेला सामाजिक दबाव कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल फेसबुकने उचलले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील फेसबुकचे खातेधारक आता शुक्रवारपासून पोस्टवर मिळणाऱ्या प्रतिक्रियांच्या संख्या आणि अन्य लोकांच्या पोस्टवरील व्हिडियो पाहू शकणार नाही. मात्र स्वतःच्या पोस्टवरील प्रतिक्रिया ते पाहू शकतील.

‘‘फेसबुक ही एखादी स्पर्धा असावी, असे आम्हाला वाटत नाही,‘‘ असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. हा एक प्रयोग असून त्यातून लोक या नव्या स्वरूपाचे स्वागत कसे करतात हे समजून येईल. हे पाऊल आम्ही व्यापक पातळीवर उचलू शकू का, हेही या या प्रयोगातून आम्हाला कळून येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ईसेफ्टी कमिशनरांच्या अहवालानुसार, त्या देशातील प्रत्येक पाचपैकी एक बालक सायबरबुलिंगचा (ऑनलाईन दादागिरी) पीडित असतो. गेल्या वर्षी एका 14 वर्षाच्या मुलीने ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित ब्रँडची टोपी घालून आपले छायाचित्र पोस्ट केले होते. त्यावर ऑनलाईन टीका-टिप्पण्यांमुळे तिने आत्महत्या केली होती. त्यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष या समस्येकडे वळले होते.

अर्थात फेसबुकने हा उपाय योजण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जुलै महिन्यात आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया मंचावर ‘‘लाईक्स’’ लपवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. हा प्रयोग कॅनडापासून सुरू झाला आणि आता तो ऑस्ट्रेलिया, ब्राझील व अन्य अनेक देशांमध्ये सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर आता कंपनीने हे पाऊल उचलले आहे. ‘‘इन्स्टाग्रामवर हे करण्यात आले आहे. मात्र फेसबुक व इन्स्टाग्राम यांची वैशिष्ट्ये वेगळी आहेत आणि या या प्रयोगातून आम्हाला वेगवेगळे आकडे बघायला मिळतील, ’’ असे फेसबुकने म्हटले आहे. मात्र हा प्रयोग किती दिवस चालेल, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक फेसबुकचा वापर करतात. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोक आज फेसबुकच्या नोंदणीकृत वापरकर्त्यांमध्ये समाविष्ट आहेत. दररोज सुमारे 200 कोटी लोक फेसबुकवर लाईक, कॉमेंट किंवा पोस्टच्या माध्यमातून सहभागी होतात. मात्र मानसिक आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो, असे अनेक तज्ञांनी दाखवून दिले होते. त्यामुळे फेसबुकवर मोठ्या प्रमाणात दबाव आला होता. गेल्या काही वर्षांत मानसतज्ञांनी व संशोधकांनी फेसबुक ॲडिक्शन (फेसबुकचे व्यसन) या नावाचा एक शब्दच तयार केला आहे. फेसबुक पाहण्यात तासंतास घालवणे, असे या व्यसनाचे स्वरूप असते. मात्र हे खरोखरच व्यसन आहे का किंवा आजार आहे का, याबद्दल तज्ञांमध्ये एकमत नाही.

आज समाजात अशा लोकांची संख्या काही कमी नाही, की जे स्वतःच्या सेल्फीवर किती लाईक्स मिळाले यानुसार आपण किती लोकप्रिय किंवा सुंदर आहोत, हे ठरवतात. त्या पसंतीच्या प्रमाणात त्यांचा आत्मविश्वास वाढतो. एखाद्या व्यक्तीच्या स्वाभिमानासाठी हे फार नुकसानीचे ठरू शकते, कारण अशा प्रकारे पोस्टला मोठ्या प्रमाणावर लाईक मिळणे खूपदा अशक्य असते. दरवेळी तुमची पोस्ट किंवा छायाचित्र लोकांना आवडेलच असे नाही. विशेषत: जर हे लोक स्वत:ची तुलना सेलिब्रिटींशी करत असतील तर त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या न्यूनगंडाला सीमा राहत नाही.

फेसबुक काय किंवा ट्विटर काय किंवा व्हॉटसअॅतप काय…यांचे व्यसन जडणे वाईटच. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, फेसबुक अॅकडीक्शन, डिसऑर्डर, सेल्फीस्टीक असे नवीन मानसिक आजार उद्भवले आहेत. त्यात सोशल मीडियाचे व्यसन हा एक महत्त्वाचा आजार आहे. म्हणून सोशल मीडियाचा वापर मर्यादितपणे व्हावा, हाच उत्तम मार्ग आहे. ज्या लाईकमुळे लोकांना फेसबुकचे हे व्यसन जडते ते लाईकच बंद केले तर हे व्यसनही जाईल हा फेसबुकचा विचार त्या दृष्टीने योग्य आहे. लाईक हीच आपली लायकी समजणाऱ्यांचे व्यसन त्यामुळे दूर होऊ शकते. त्यामुळे या प्रयोगाला अनुकूल फळे यावीत, हीच अपेक्षा.

Leave a Comment