भारतातील या कायद्यांविषयी तुम्हाला माहिती आहे का?


कोणत्याही संस्थेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी त्या संस्थेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणे अतिशय आवश्यक असते. आपले राष्ट्र ही देखील एक संस्था आहे असे म्हणायचे झाले, तर या संस्थेला देखील कायद्यांच्या आणि नियमांच्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. पण असे कितीतरी कायदे आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. हे कायदे नागरिकांच्या हक्कांच्या आणि सुविधांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे या कायद्यांविषयी माहिती असणे अगत्याचे आहे.

आपल्याला आवश्यकता भासेल तेव्हा कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंट मधील शौचालय वापरण्याची आणि पिण्यासाठी पाणी मागण्याची सुविधा आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली आहे. या दोन्ही सोयी मोफत पुरविणे हे सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना बंधनकारक आहे. तसेच आपल्यासोबत जर एखादा पाळीव प्राणी असेल, तर त्याला ही मोफत पिण्याचे पाणी पुरविणे हॉटेल्स ना बंधनकारक आहे.

एखाद्या महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या नियमाला मंजुरी दिलेली आहे. पण जर पोलिसांकडे कोणत्याही स्वरूपात महिलेविरुद्ध लेखी तक्रार असेल, किंवा महिलेवरील आरोप सिद्ध करणारा कोणत्याही प्रकारचा लिखित पुरावा असेल, तर मात्र हा नियम लागू होत नाही. तसेच महिलेला अटक करण्यासाठी महिला पोलीस अधिकारी हजर असणे आवश्यक असते.

२०१३ साली पारित करण्यात आलेल्या नवीन कायद्यानुसार एखादी महिला, घडलेल्या अपराधाची तक्रार कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवू शकते. ही तक्रार नोंदवून घेणे संबंधित पोलिस चौकीवर बंधनकारक आहे. घडलेला अपराध त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला नाही या कारणावरून पोलीस तक्रार लिहून घेण्यास मनाई करू शकत नाहीत. तक्रार लिहून घेतल्यानंतर महिलेच्या जबाबानुसार पुढील चौकशी करणे देखील संबंधित पोलीस चौकीसाठी बंधनकारक असते. जर पीडित माहिला तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस चौकीपर्यंत जाण्यास असमर्थ असेल, तर ती महिला ई-मेल द्वारे किंवा रेजिस्टर्ड पोस्ट द्वारे आपली तक्रार पोलीस महानिरीक्षाकांपर्यंत पोहोचवू शकते.

२०११ मध्ये आलेल्या नवीन कायद्यानुसार अविवाहित पुरुष मूल दत्तक घेऊ शकत नाहीत. हा कायदा महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या शिफारशीने अस्तित्वात आणला गेला आहे. ‘ लिव्ह ईन ‘ संबंध बेकायदेशीर नाहीत. तसेच एखादी महिला आणि पुरुष अविवाहित असतील, तर त्या कारणावरून त्यांना हॉटेलमध्ये रूम देणे नाकारता येऊ शकत नाही.

Leave a Comment