मॅरेज कॉन्ट्रॅक्टर – एक उत्तम व्यवसाय

marraige
आपण या मालिकेमध्ये फारसे भांडवल न गुंतवता कोणते व्यवसाय करता येतील याची माहिती घेत आहोत. आपल्या आसपास वातावरण बदलत चाललेले आहे आणि या बदलत्या वातावरणात असे अनेक व्यवसाय निर्माण होत आहेत की, जे कसलेही भांडवल न गुंतवता करता येतात. हा बदल नेमका काय आहे याची थोडी मूलभूत माहिती घेतली पाहिजे. हे बिनभांडवली उद्योग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ते सेवा उद्योग आहेत. त्यांना सर्व्हिस इंडस्ट्री असे म्हटले जाते. एखाद्या क्लायंटला एखादी सेवा देेणे यासाठी काही भांडवल लागत नसते. म्हणून हा सेवा उद्योग म्हणजे बिनभांडवली उद्योग आहे. सेवा उद्योगाची वाढ का होत आहे हेही नीट समजून घेतले पाहिजे. सेवा उद्योगाची वाढ ही वाढत्या समृद्धीतून होत असते. समाजाची समृद्धी कृषी व्यवसाय आणि कारखानदारीतून वाढत असते. मात्र त्यातून होणार्‍या समृद्धीपोटी समृद्ध लोकांना निरनिराळ्या प्रकारच्या सेवांची गरज वाढत जात असते. या सेवांमध्ये बँकिंगच्या सेवेपासून ते रुग्णालयात खितपत पडलेल्या रुग्णाजवळ बसण्याच्या सेवेपर्यंत सगळ्या सेवांचा समावेश होतो. या सगळ्या सेवा या गरजेतून निर्माण झालेल्या असतात आणि त्या सेवा देणार्‍यांना सेवा घेणारी व्यक्ती भरपूर पैसे देऊ शकत असते.

अमेरिकेसारख्या समृद्ध देशामध्ये एकूण अर्थव्यवस्थेच्या किंवा राष्ट्रीय उलाढालीच्या ३० टक्के उलाढाल ही सेवा उद्योगात होत असते. कारण समृद्ध समाजाची ती गरज असते. एरवी सामान्य परिस्थितीमध्ये लोक आपल्या कपड्यांना स्वत:च इस्त्री करतात, स्वत:च्या पादत्राण्यांना स्वत:च पॉलिश करतात, मुलांना स्वत:च शाळेत नेऊन सोडतात, मुलांचा अभ्यास घेतात पण परिस्थिती बदलली आणि चार पैसे हाती आले की, या सगळ्या सेवा ते पैसे देऊन घ्यायला लागतात. इस्त्रीसाठी कपडे लॉन्ड्रीत टाकतात, बुटांचे पॉलिश पॉलिशवाल्याकडून करून घेतात, मुलांचा अभ्यास घेण्यासाठी त्याला शिकवणी लावतात आणि त्यांना शाळांत नेऊन सोडण्यासाठी वाहने भाड्याने घेतात. खिशात चार पैसे आले म्हणूनच हा बदल होतो आणि त्यातूनच नवे नवे सेवा उद्योग वाढीस लागतात. इव्हेन्ट मॅनेजमेंट हा असाच एक गरजेतून निर्माण झालेला आणि समृद्धीमुळे वाढलेला व्यवसाय आहे. आपल्या घरी एखादा लग्न समारंभ असतो तेव्हा आपण पूर्वीच्या काळी लग्न समारंभ कसे होत असत आणि आजच्या काळात ते कसे होतात याची तुलना करून बघावी म्हणजे आपल्याला लग्न समारंभाच्या निमित्ताने इव्हेन्ट मॅनेजमेंटला कशी चलती मिळाली आहे याची जाणीव होईल.

पूर्वी लग्न समारंभा पाच-पाच दिवस होत असत. भरपूर पाहुणे-रावळे जमत आणि १५-१५ दिवस त्यांचा मुक्काम पडे. वाड्यात मांडव टाकून त्यात सारे कार्यक्रम होत. भरपूर शिधा देऊन स्वयंपाक्याकडून स्वयंपाक करून घेतला जाई आणि घरातल्याच महिला स्वयंपाकाचे बरेच काम करत असत. यातल्या कोणत्याही कामाला बाहेरची माणसे लावली जात नसत. कारण घरच्या आणि नात्यातल्या लोकांना भरपूर मोकळा वेळ असे. ते कष्टाची कामे करायला तयार असत. १००-१०० घागरी पाणी घरचेच लोक भरून टाकत असत. पण आता लोकांना वेळ नाही, मोठे वाडे नाहीत आणि शारीरिक कष्टाची सवय कमी झालेली आहे. परिणामी लग्नातल्या सगळ्या गोष्टी कंत्राट देऊन करवून घेतल्या जात आहेत. त्यातूनच मंगल कार्यालय नावाची यंत्रणा उभी राहिली आहे. या मंगल कार्यालयामध्ये आता कंत्राटदार निर्माण झाले असून ते लग्नाची सारी कामे करायला लागले आहेत. तुम्ही फक्त नवरा-नवरी घेऊन या, बाकी सगळी कामे आम्ही करू असे हे कंत्राट आहे. त्यामध्ये भटजी शोधण्यापासून ते बँड वाजविण्यापर्यंत सगळी कामे कंत्राटदार करत असतात आणि लोकांनाही ते परवडते. एकदाच एक मोठी रक्कम देऊन टाकली की, सगळ्या दगदगीतून सुटका होते.

या नव्या व्यवसायाकडे सुशिक्षित तरुणांनी एक व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे. कारण या व्यवसायामध्ये व्यवसाय करणार्‍याची कसलीही गुंतवणूक नाही. एखादी विशिष्ट मंगल कार्यालये गाठून त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केले की, हा व्यवसाय सुरू होतो. हा व्यवसाय करणार्‍याला एकही पैसा भांडवल म्हणून गुंतवावा लागत नाही. भटजी, घोडा, स्पिकर, केटरर, वाढपी, फोटोग्राफर, बँड अशी सगळी कामे करणार्‍या व्यावसायिकांचे केवळ कोऑर्डिनेशन करण्याचे काम त्याला करावे लागते. त्यातून होणारी प्राप्तीही चांगली असते. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न एकदाच होत असते आणि लोकांनी लग्नासाठी बराच पैसा साठवून ठेवलेला असतो. लग्न समारंभात लोकांचा सढळ हाताने खर्च करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे अशा कंत्राटदारांना चार पैसे जास्त मिळून जातात. उगाच नोकरीसाठी याचना करून, लोकांच्या मर्जीप्रमाणे वागून महिनाभरात जेवढा पगार मिळणार नाही त्यापेक्षा किती तरी जास्त पैसा एखाद्या लग्नाच्या समारंभातून मिळून जाऊ शकतो. या कामामध्ये मंदी नाही, कारण विवाह समारंभ सारखे होतच असतात. शिवाय बारसे, साखरपुडा, डोहाळे जेवण अशाही कामांची कंत्राटे सहज मिळू शकतात. मराठी तरुणांनी याचा विचार केला पाहिजे.

Leave a Comment