सर्वसाधारण इव्हेंट मॅनेजमेंट

event
सध्या आपल्या समाजात अनेक तरुण आपापल्या कुवतीप्रमाणे आणि समजुतीप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट या व्यवसायाकडे वेगाने वळायला लागले आहेत. कारण त्यांना या व्यवसायाची गरज लक्षात आलेली आहे. लोकांना विविध प्रकारचे सभा, समारंभ पार पाडताना कराव्या लागणार्‍या कष्टाचा कंटाळा येत आहे. समारंभ तर करावासा वाटतो परंतु त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची त्यांची तयारीही नसते आणि त्यांना तसा वेळही मिळत नाही. तेव्हा या समारंभातली आयोजनाची सगळी कष्टाची कामे कोणावर तरी सोपवून मोकळे व्हावे असा विचार ते करतात आणि त्यांची ती गरज हाच काही लोेकांचा व्यवसाय होऊ शकतो. हे ओळखून बरेच तरुण इव्हेंट मॅनेजमेंटकडे वळले आहेत. या व्यवसायासाठी पदरचा पैसा गुंतवावा लागत नाही. भांडवल लागत नाही. फार मोठी यंत्रणाही लागत नाही. यंत्रसामुग्रीची तर गरजच नसते. ज्या संस्थेचे इव्हेंट मॅनेजमेंट करायचे असेल त्याच संस्थेची जागा आणि तिच्याच बर्‍याचशा यंत्रणा वापरून त्यांचा समन्वय साधण्याचे काम म्हणजेच कॉऑर्डिनेशन करावे लागते. या सोयीमुळेच बरेच तरुण स्वतःहून या व्यवसायाकडे वळले आहेत.

अनेकदा काही संस्थांचे पुरस्कार वितरण समारंभ असतात. काही संस्थांना काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करायचे असतात. एखाद्या संस्थेला एखादा सत्कार समारंभ करायचा असतो. मात्र हे समारंभ सुरळीतपणे पार पडतील एवढी यंत्रणा त्यांच्याकडे नसते, मनुष्यबळ नसते. त्यामुळे ही कामे कोणावर तरी सोपवली जातात. अशा संस्थांना हे काम अवघड जाते. कारण त्यांना ते कधी तरी करावे लागते. त्यांचे ते नेहमीचे काम नसते. पण त्यांना अवघड वाटणारे हे काम इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेला सोपे वाटते कारण अशा समारंभासाठी आवश्यक असणार्‍या सार्‍या यंत्रणा आणि सोयी यांच्याशी इव्हेंट मॅनेजरचा नेहमीचा संबंध असतो. तेव्हा बसल्या बैठकीला केवळ चार फोन फिरवून एखादा इव्हेंट मॅनेजर सभागृह निमंत्रण पत्रिका छापणारा प्रिंटर, जाहिरात संस्था, जनसंपर्क यंत्रणा, पत्रिका वाटणारी कुरिअर सर्व्हिस, स्पीकर, पत्रकार या सर्वांना कामाला लावू शकतो. कार्यक्रम म्हटल्यानंतर अनेक प्रकारची व्यवधान सांभाळावी लागतात. व्यासपीठाची सजावट, प्रसिध्दी, सूत्रसंचालन, व्यासपीठावरच्या सर्व सोयी या सर्वांचे व्यवस्थापन, फार बारकाईने करावे लागते. दीप प्रज्वलनापासून खुर्च्यांच्या व्यवस्थेपर्यंत कोणत्याही गोष्टीत कमतरता राहिली तरी ती चर्चेचा विषय होत असते. म्हणून इव्हेंट मॅनेजर कार्यक्रमाची चेकलिस्ट तयार करत असतात आणि तिच्यानुसार सारी कामे बारकाईने पार पाडत असतात.

इव्हेंट मॅनेजमेंटचे काम प्राथमिक स्तरावर करणार्‍या आणि फारशी यंत्रणा हाती नसलेल्या युवकांना असे लहानसहान कार्यक्रम करूनसुध्दा बर्‍यापैकी उत्पन्न मिळवता येते. काही वेळा काही कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी एकत्र येणार असतात. त्यांची जेवणाखाण्याची, उतरण्याची आणि कॉन्फरन्सची तयारी करायची असते. एखाद्या कंपनीमध्ये कर्मचार्‍यांसाठी काही आयोजन करायचे असते. अशाही कामांसाठी आता इव्हेंट मॅनेजमेंट केली जायला लागली आहेत. मात्र या व्यवसायाची व्याप्ती एवढी लहान नाही. आता राजकीय पक्षसुध्दा जाहीर सभांच्या आयोजनासाठी इव्हेंट मॅनेजरची सेवा घेत आहेत. कारण आता कोणत्याही जाहीर सभेत श्रोते मैदानावर मांडी घालून बसत नाहीत. सर्वांसाठी खुर्च्या मोठ्या संख्येने आणाव्या लागतात. श्रोते आणि प्रेक्षक यांच्या सभास्थानी येण्याचे मार्ग आणि बाहेर पडण्याचे मार्ग, सुरक्षा कवच अशा कितीतरी सोयी आखाव्या लागतात. सभा मोठी असल्यास ध्वनीक्षेपक प्रभावी असाव्या लागतात आणि काही वेळा क्लोज सर्किट टी.व्ही. बसवावे लागतात. श्रोत्यांना जमा करण्यासाठी जाहिरातबाजी करावी लागते.

राजकीय पक्षाच्या एकेका सभेचे खर्चाचे बजेट काही लाखांत आणि काहीवेळा कोटीतसुध्दा असते. मात्र सभा व्यवस्थित झाली पाहिजे आणि दणदणीत झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. सध्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठीसुध्दा इव्हेंट मॅनेजमेंटची सेवा घेतली जात आहे. अशा सेवेत तर भव्य व्यासपीठ, प्रचंड प्रकाशझोत, विजेच्या दिव्यांची आरास, सजावट आणि प्रेक्षकांच्या बसण्याच्या व्यवस्था अशी आव्हाने समोर असते. हेही सारे व्यवहार करोडो रुपयांचे असतात. त्यांचे व्यवस्थापन हा एक बिनभांडवली धंदा असतो परंतु तो करताना व्यवस्थापन कौशल्य, शिस्त आणि नेमकेपणा या गुणांचा वापर होत असतो. तो न केल्यास व्यवसाय नीट चालत नाही. म्हणून पुरेशा व्यवस्थापन कौशल्यासह या क्षेत्रात शिरकाव केल्यास बिनभांडवली उद्योग म्हणून लाखो रुपये मिळवण्याची संधी आहे.

Leave a Comment