मधमाशा पालनाचा व्यवसाय

honey
शेतकर्‍यांना निसर्गाशी सतत झगडावे लागत असल्यामुळे सातत्याने प्रतिकूल परिस्थितीला आणि आर्थिक अनिश्‍चिततेला तोंड द्यावे लागते आणि पैशाच्या अडचणी, कर्ज, व्याज, लाचारी आणि गरिबी या चक्रात तो सातत्याने सापडलेला असतो. जर शेतकर्‍याने आपल्या शेतामध्ये छोटा-मोठा जोडधंदा केला तर तो या अडचणीवर मात करू शकतो आणि स्वाभिमानी, स्वावलंबी, कर्जमुक्त, स्वस्थ जीवन जगू शकतो. जोडधंद्यांमध्ये अलिकडच्या काळात विकसित झालेला चांगला जोडधंदा म्हणजे मधमाशा पालन. मधमाशा जंगलामध्ये किंवा जमेल त्या झाडावर पोळे तयार करून त्यात मध साठवतात. तो मध गुराखी मुले हस्तगत करतात आणि मधावर यथेच्छ ताव मारतात. मात्र हेच मधमाशांचे पालन व्यवस्थित केले आणि त्यापासून मिळणारा मध एकत्रित करून तो बाटल्यात भरून विकला तर तो शेतकर्‍याच्या कष्टप्रद जीवनामध्ये संजीवनी मंत्रासारखा ठरतो. त्यासाठी मधमाशा पालन करण्याचा शेतकर्‍यांनी प्रयत्न केला पाहिजे.

व्यवस्थितपणे मधमाशा पालन केले तर एक एकर शेतात ठेवलेल्या मधमाशांच्या पेट्यातून वर्षाकाठी ५० हजार ते ६० हजार रुपयांचा मध जमा होऊ शकतो. यापेक्षाही अधिक मध जमा करणारे लोकही आहेत. खादी ग्रामोद्योग मंडळाने मधमाशाच्या व्यवसायाला गती देण्याचा आणि त्यातून शेतकर्‍यांना स्वावलंबी करण्याचा चांगलाच प्रयत्न केलेला आहे. तेव्हा ज्या शेतकर्‍यांना मधमाशा पालनामध्ये रुची असेल किंवा हा व्यवसाय आपण करावा असे ज्यांना वाटत असेल त्यांनी आपल्या जवळपासच्या खादी भांडारामध्ये किंवा खादी ग्रामोद्योगच्या कार्यालयामध्ये संपर्क साधून अधिक माहिती मिळवायला हरकत नाही.

महाराष्ट्रात महाबळेश्‍वर येथे खादी ग्रामोद्योग मंडळाने या संबंधातील संशोधन करणारे संस्था स्थापन केलेली आहे आणि या संस्थेतून मधमाशा आणि मध उत्पादन या संबंधात माहिती दिली जाते. जिज्ञासूंनी महासंचालक, मधुमक्षिका पालन केंद्र, महाबळेश्‍वर, जि. सातारा. फोन ०२१६८-२६०२६४ या ङ्गोन क्रमांकावर संपर्क साधावा. या संस्थेमार्फत मधाच्या विक्रीबाबतही मार्गदर्शन केले जाते. सरकार मधाची खरेदी सुद्धा करते. सध्या १०० रुपये किलो असा सरकारी खरेदीचा भाव आहे. त्याशिवाय अनेक खाजगी संस्था मध विक्रीचा व्यवसाय करत असतात. त्यांनाही शेतकरी मध विकू शकतात.

मधाचा वापर सध्या वाढत चालला आहे. शहरातले लोक वरचेवर लठ्ठ होत आहेत. रोज मध आणि पाणी मिसळून प्याले म्हणजे वजन कमी होते. त्यामुळे मधाची मागणी सुद्धा वाढत आहे. म्हणजे पुढच्या काळात मधाला प्रचंड मागणी राहणार आहे. सुधारलेल्या देशांमध्ये मधाचा वापर दरसाल दरडोई अडीच किलो एवढा आहे. भारतात मात्र हे प्रमाण दरसाल दरडोई केवळ ८ ग्रॅम एवढे आहे. हे प्रमाण वाढत जाऊन किती वाढू शकते याचा अंदाज यावा आणि यापुढे मधाला किती डिमांड राहणार आहे हे लक्षात यावे यासाठी हे आकडे दिले आहेत.

हे आकडेच असे सांगतात की, येत्या दहा वर्षात आयुर्वेदाचा प्रचार खूप झाला तर भारतातला आत्ताचा मधाचा वापर कमीत कमी दहापट तरी नक्कीच वाढू शकतो. महाराष्ट्रात महाबळेश्‍वरमध्ये हा व्यवसाय कसा केला जातो हे जाऊन पाहिले पाहिजे.

Leave a Comment