भीतीवर मात करा

freighten
अनेक विद्यार्थ्यांना आणि नोकरी मिळविण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांना इंटरव्ह्यूला सामोरे जावे लागते. परंतु त्यांना इंटरव्ह्यूची भीती वाटते. अशा लोकांच्या आयुष्यामध्ये केवळ इंटरव्ह्यूचीच नव्हे तर इतरही अनेक प्रकारचे भय व्यापून राहिलेले असते. कोणतीही गोष्ट करताना आपण अपयशी तर होणार नाही ना? आपल्याला ती गोष्ट जमेल की नाही? अशी भीती त्यांना सतत वाटत असते.

अशा भीतीवर मात करण्यासाठी काय करावे, असा प्रश्‍न विचारला जातो. परंतु त्याचे नेमके उत्तर देता येत नाही. मात्र काही मानसशास्त्रज्ञ भीतीवर मात करण्याची एक नामी युक्ती सांगत असतात. भीती ही एक भिंत असते. ती आपण आणि आपले यश यांच्या दरम्यान उभी असते. भिंत अशी काही अभेद्य वाटत असते की, तिच्या पलीकडचे यश आपल्या नजरेलाच येत नाही. त्यामुळे काय करावे, असा प्रश्‍न आपल्याला भेडसावत राहतो.

अशा प्रसंगी धडक मारून ती भिंत पाडणे किंवा धाडसाने तिला ओलांडून तिच्या पलीकडे जाणे हाच मार्ग उपलब्ध असतो. खरोखर आपण असे करतो तेव्हा मात्र आपल्या लक्षात येते की, आपण जिला घाबरत होतो ती भिंत प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हतीच. तिचा आपल्याला केवळ भास होत होता. भास होत होता याचा अर्थ असा की, ती भीती आपल्या मनात होती.

घराची भिंत असावी तशी ती अस्तित्वातच नव्हती. मग जी वस्तू आपल्या मनात आहे ती वस्तू काढून टाकायची असेल तर आपले मनच आपल्याला साफ करावे लागेल आणि तसे ते केले की भीती नष्ट होते. तेव्हा आपल्याला ज्या ज्या वेळी भीती वाटेल त्या त्या वेळी त्या भीतीवर विचार करीत बसण्यापेक्षा ती अस्तित्वातच नाही असे गृहित धरून तिच्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

अध्यात्मामध्ये ऐहिक जीवनातील दु:खांना दोरीच्या सापाची उपमा दिली जाते. दोरीचा साप समोर आला तर आपण त्याला ओलांडून पलीकडे जाण्याची हिंमत करत नाही. परंतु ज्या क्षणाला तो साप खरा नसून बनावट आहे याचे ज्ञान होते तेव्हा मात्र आपली भीती नष्ट होते. आपल्याला झालेले हे ज्ञान म्हणजे आपल्या मनाची दुरुस्ती असते. दोरीत किंवा सापात काहीच बदल झालेला नसतो. सापाच्या खर्‍या स्वरुपाचा बोध आपल्याला झालेला असतो. म्हणजे सापाचे खरे ज्ञान आपल्याला होते. असेच भीतीचे झाले की, भीती सुद्धा नष्ट होते.

Leave a Comment