प्रश्‍नांचे वजन विचारात घ्या

question
स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणे हे जेवढे अभ्यासावर अवलंबून आहे तेवढेच ते परीक्षेचा पेपर लिहिण्याच्या कौशल्यावर सुद्धा अवलंबून आहे. परीक्षा पेपर लिहिताना तणावरहित अवस्थेत लिहिला पाहिजे. ही सर्वात महत्वाची सूचना आहे. मात्र हा तणाव कमी करण्यासाठी तणावाची कारणे जाणून घेतली पाहिजेत. आपण परीक्षेच्या बाकावर बसलेले असतो आणि समोर प्रश्‍नपत्रिका असते. त्या प्रश्‍नपत्रिकेचे अवलोकन आपण कसे करतो यावर आपला तणाव वाढणे किंवा कमी होणे अवलंबून असते. तेव्हा प्रश्‍नपत्रिकेचे विभाग किती आहेत हे बघा. त्या प्रत्येक विभागामध्ये कशा पद्धतीचे प्रश्‍न आले आहेत यावर नजर टाका.

प्रश्‍नपत्रिका काढणे हे सुद्धा एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्रामध्ये प्रश्‍नांची काठीण्य पातळी हा घटक सर्वात महत्वाचा समजला जातो. विविध प्रकारच्या परीक्षा संपल्या की, पेपर कसा होता यावर चर्चा होते. काही लोक म्हणतात, पेपर सोपा होता तर काहींना तो अवघड वाटलेला असतो. पूर्वीच्या काळी ही पद्धत होती. पेपर काढणारा एखादा शिक्षक कठीणच प्रश्‍न जास्त काढायचा आणि एखादा शिक्षक सोपे प्रश्‍न जास्त काढायचा. पण आता शास्त्राचा अवलंब होत असल्यामुळे किती काठीण्य पातळीचे प्रश्‍न किती विचारावेत याचे नियम ठरलेले आहेत. तेव्हा प्रश्‍नपत्रिकेत काही प्रश्‍न सोपे असतात आणि काही प्रश्‍न अवघड असतात.

सोप्या प्रश्‍नांमध्ये तुम्हाला असलेली माहिती जाणून घेतलेली असते. थोड्या अवघड प्रश्‍नांमध्ये विद्यार्थी ऍप्लीकेशन ऑङ्ग माईंड किती करतो हे पाहिलेले असते. म्हणजे हे प्रश्‍न डोके लढवणारे असतात. अधिक काठीण्य पातळीचे प्रश्‍न कोणा तरी दोन गोष्टीत तुलना करणारे असतात. तर सर्वात काठीण्य पातळी असलेल्या प्रश्‍नात विद्यार्थ्याला स्वत:चे मतप्रदर्शन करायला लावलेले असते. अशी प्रश्‍नपत्रिका समोर आल्यानंतर सर्वाधिक काठीण्य पातळीचे प्रश्‍न थोडे बाजूला ठेवावेत आणि सोपे सोपे प्रश्‍न आधी सोडवून टाकावेत.

मग हळूच त्यापेक्षा अधिक काठीण्य पातळीचा प्रश्‍न हाती घ्यावा. सोप्या प्रश्‍नांकडून कठीण प्रश्‍नांकडे जावे. त्याऐवजी आपण उलट्या दिशेने प्रवास करायला लागलो तर कठीण प्रश्‍न आधी सोडविल्याने मेंदू शिणून जातो आणि या प्रश्‍नामध्ये आपण केलेले विश्‍लेषण नक्की योग्य त्या पद्धतीने आले आहे की नाही याविषयी आपल्याच मनात शंका राहते आणि तशा साशंकावस्थेत आपण सोपे प्रश्‍न सुद्धा नीट सोडवू शकत नाही.

Leave a Comment