केटरिंग व्यवसाय

catring
सध्याच्या काळामध्ये जवळजवळ नगण्य भांडवलात सुरू करता येणारा छान, सोपा उद्योग म्हणजे केटरिंग. सध्याच्या काळात लोकांची समारंभप्रियता फार वाढली आहे. परंतु सर्वसाधारण समृद्धी वाढल्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम जेवण्या-खाण्यासहित होत आहेत. परंतु कार्यक्रम आयोजित करणारे लोक जेवणाच्या व्यवस्थेसाठी स्वत: काही करायला तयार नाहीत. जेवणाची ऑर्डर कोणाला तरी देऊन मोकळे होण्यावर त्यांचा भर आहे. जेवणे आणि खाणे हा जीवनातला अविभाज्य भाग असल्यामुळे जेवण्या-खाण्याची व्यवस्था करण्याच्या कामाला काही तोटाच नाही. एकदा केटरिंग व्यवसाय सुरू केला की, कोठे ना कोठे खाण्याचे पदार्थ पुरविण्याची ऑर्डर दररोज मिळणारच. केटरिंग व्यावसायिक कधीही रिकामा बसायचा नाही. अगदी जेवणाची ऑर्डर नाही मिळाली तरी अल्पोपहाराची ऑर्डर नक्कीच मिळते. गेला बाजार कोठे तरी चहा, कॉफी देण्याचे काम तर नक्कीच मिळून जाते. सातत्याने कार्यक्रम करणार्‍या संस्था आणि ते कार्यक्रम होणारी सभागृहे यांच्याकडे सातत्याने चौकशी केली की, कामे मिळू शकतात आणि यातून होणारा नफाही चांगला असतो.

आज अगदी लहान लहान शहरात सुद्धा केटरिंग व्यवसायाला उत्तम कामे मिळत आहेत आणि जेवणाचे रेट सुद्धा खूप वाढलेले आहेत. जेवणाच्या एका ताटाला किमान ८० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत मिळू शकतात. ही किंमत त्या शहरावर आणि ताटातल्या पदार्थावर ठरलेली असते. केवळ समारंभच नाही तर बैठका, परिषदा आणि अधिवेशने यात सुद्धा जेवणा-खाण्याच्या खूप सोयी कराव्या लागतात. शिवाय धार्मिक समारंभ जेवणाशिवाय संपत नाहीत. या सार्‍या कामांमध्ये गुंतलेल्या व्यावसायिकांना स्वत:चे भांडवल काहीच गुंतवावे लागत नाही. काही भांडी, आणि गॅसच्या शेगड्या, टाक्या लागतात ही गोष्ट खरी आहे. परंतु या सगळ्या गोष्टी भाड्याने मिळतात. ज्याने कामाची ऑर्डर दिली असेल त्याच्याकडूनच काही पैसे ऍडव्हान्स घेऊन अशी भांडी भाड्याने आणता येतात. आपला पैसा घालण्याची गरज नाही. धान्य, तेल, साखर, तूप याही गोष्टी केटररने आणायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा ऍडव्हान्स मिळू शकतो किंवा हे सारे सामान उधारीने आणता येते.

स्वत: आचारी म्हणून काम करणारे काही लोक असतात आणि ते पात्रांची संख्या किंवा गोड पदार्थांचे वजन या निकषावर स्वयंपाक करण्याचे कंत्राट घेतात. काही ठिकाणी सगळ्या स्वयंपाकाची सोय करून केटरर पात्रावर पैसे आकारतात. या दोन्ही व्यवस्थांमध्ये आपले म्हणून भांडवल काही लागत नाही. आज मोठ्या शहरांमध्ये पदवीधर विद्यार्थी सुद्धा केटरिंगच्या व्यवसायात शिरले आहेत. पूर्वी हा प्रांत अशिक्षित लोकांसाठी राखीव होता. आता तो सुशिक्षितांनी काबीज केला आहे. त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून या व्यवसायाचे स्वरूप बदलून टाकले आहे. पूर्वीचे आचारी ठराविक पद्धतीचा स्वयंपाक करीत असत. जेवणाच्या पंक्ती उठवायच्या म्हटले की, ठराविक पद्धतीचे वरण किंवा आमटी, भात, पोळ्या आणि आधीच करून ठेवलेला एखादा लाडूसारखा गोड पदार्थ या पलीकडे आचार्‍यांची मजल जात नव्हती. पण केटररला ऑर्डर देणार्‍या ग्राहकांच्या अभिरूचीत सुद्धा आता बदल झाला आहे. सततच्या प्रवासाने आणि चलनवलनामुळे विविध प्रांतातल्या खाद्य पदार्थांची माहिती लोकांना झालेली आहे. तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा एखाद्या समारंभात वडा-सांबर आणि इडली-सांबर आता नेहमीचे झाले आहे. जेवणानंतर पाणीपुरी हा सुद्धा प्रकार आपण उत्तर भारतीयांकडून स्वीकारलेला आहे. ठराविक पद्धतीच्या जिलेबी, लाडू अशा पक्वान्नांपेक्षाही वेगळी पक्वान्ने आता ताटात यायला लागली आहेत. त्यात बंगाली मिठायाही समाविष्ट आहेत. या परप्रांतातल्या खाद्य पदार्थांमुळे महाराष्ट्रातल्या मेजवान्या सुद्धा संस्मरणीय ठरायला लागल्या आहेत.

सुुशिक्षित केटररर्सनी जेवणाचा बाज सुद्धा बदलून टाकला आहे. बुफे सिस्टिम ही त्यांनीच रूढ केलेली आहे. क्वचित काही प्रसंगी शाही खाने दिले जातात. त्या शाही खान्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेपासून ताटा-पाटापासून तांब्या पात्रापर्यंत सर्व काही शाही असते. हा सारा शाही जामानिमा भाड्याने मिळतो. त्याचे भाडे दिले की काम भागले. जेवणाची व्यवस्था कितीही आगळीवेगळी असो, जेवणाच्या पदार्थांत कितीही विविधता असो शेवटी माणसाचे पोट आहे तेवढेच आहे. त्यामुळे जेवण थोडे, पण जामानिमा भारी असा खाक्या उरतो. भाड्याने आणलेल्या शाही सोयींचे भाडे काही हजारांमध्ये द्यावे लागते, परंतु त्या सोयींसहीत जेवणाची व्यवस्था केली की, जेवणाचा दर मात्र ताटामागे पाचशे ते हजार रुपये होऊ शकतो आणि केटररची कमाई काही पटीत वाढते. या क्षेत्रातल्या काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार केटरिंगच्या व्यवसायामध्ये ४० ते ५० टक्के मार्जिन असते आणि हे सारे स्वत:चे भांडवल न गुंतवता प्राप्त होते.

Leave a Comment