इंटरव्ह्यूला अर्जातून विषय मिळतात

interview
संघ लोकसेवा आयोगाच्या आय.ए.एस., आय.टी.एस. किंवा आय.एङ्ग.एस. अशा सेवांसाठी उमेदवारांची निवड करताना इंटरव्ह्यूला ङ्गार महत्व असते. या परीक्षांमध्ये या मुलाखतीसाठी ३०० गुण ठेवलेले असतात आणि तज्ज्ञांचे एक पॅनल त्या मुलाखतीमधून उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचा ठाव घेत असतात. आयोगाचे अध्यक्ष किंवा एखादे ज्येष्ठ संचालक यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांचे पॅनेल ही मुुलाखत घेत असते. मुलाखत कशी दिली आहे यावरून गुण दिले जातात. साधारण ५० पासून २५० पर्यंत गुण मिळतात. १५० गुण बरे समजले जातात. मात्र त्यापेक्षा कमी गुण असतील तर उमेदवार मुलाखतीत अपयशी ठरला असे समजले जाते. १८० पेक्षा जास्त गुण असतील तर मुलाखत चांगली मानली जाते आणि २०० ते २५० गुण उत्तम मानले जातात. मुलाखत घेणारे सदस्य विद्यार्थ्याची शैक्षणिक पात्रता आणि अभ्यासाचा विषय यावर मुलाखत घेताना जास्त भर देतात. विद्यार्थी आय.आय. टी. सारख्या नामवंत संस्थेत शिक्षण घेऊन आलेला असेल किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑङ्ग मॅनेजमेंट स्टडिज्सारख्या मान्यवर संस्थेतून आला असेल तर प्रश्‍नांचा रोख त्या संस्थेच्या माहितीकडे असतो. इंटरव्ह्यूच्या बाबतीत लक्षात ठेवावयाची एक महत्वाची बाब अशी की, इंटरव्ह्यूचे प्रश्‍न पॅनेल सदस्यांच्या कल्पनेतून निर्माण होत नसतात तर उमेदवाराच्या अर्जातून निर्माण होत असतात. तेव्हा इंटरव्ह्यूला जाताना आपण आपल्या अर्जामध्ये आपल्याविषयी काय लिहिले आहे ते नीट वाचावे आणि त्यातून कोणते प्रश्‍न निर्माण होऊ शकतील याची कल्पना करून त्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याची तयारी करून जावे. एखादा उमेदवार ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण गावातून आला असेल तर त्याला त्याच्या गावाच्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीविषयी खोदून खोदून विचारले जाते आणि उमेदवार आपल्या राहत्या गावाविषयी किती जागरूक आहे हे तपासून पाहिले जाते. अर्जातून प्रश्‍न निर्माण होण्याचा दुसरा प्रकार म्हणजे आपले छंद. आपण आपल्या छंदाविषयी काही तरी लिहिलेले असते आणि पॅनल सदस्य त्या छंदाविषयी काही माहिती विचारत असतात. तेव्हा त्याचीही तयारी ठेवली पाहिजे. आपल्या सभोवतालच्या समस्या आणि प्रश्‍नांविषयी उमेदवार किती जागरूक आहे हेही आवर्जून पाहिले जात असते.