सर्वसामान्य पर्यटकांना खुले होणार सियाचीन


जगातील सर्वोच्च स्थानावरील युद्धभूमी अशी ओळख असलेले सियाचीन लवकरच सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुले करण्याबाबत विचार सुरु असल्याचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी एका परिषदेत सांगितले. अति दुर्गम भाग असलेली सियाचीनची युद्धभूमी भारतीयांसाठी खोलण्याचा विचार केला जात आहे असे सांगताना ते म्हणाले, यामुळे भारतीयांना आपली सेना आणि अश्या दुर्गम भागात तिच्या समोर असलेली आव्हाने यांची माहिती मिळेल आणि त्याचा फायदा राष्ट्रीय अखंडता राखण्यासाठी निश्चित होईल.

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यानंतर सियाचीन सह अति उंचीवरील लष्करी ठाणी भारतीय नागरिकांसाठी खुली करावीत असा विचार केला जात आहे असे आर्मी सूत्रांकडून समजते. भारतीय नागरिकांना या भागात लष्कराचे काम कसे चालते याची उत्सुकता आहेच. भारतीय सेनेने त्याची प्रशिक्षण केंद्रे आणि काही संस्था भारतीय नागरिकांना पाहण्यासाठी परवानगी देण्याचे धोरण ठरविले आहे. तशीच सीमावर्ती भागातील लष्करी ठाणी, ग्लेशियर याबाबत विचार सुरु आहे.

सियाचीन हा लडाखचा भाग आहे. लडाखला नुकताच केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला आहे. लडाखच्या भागात पर्यटक येतात, तेव्हा कारगील भागातील टायगर हिल्स, आणि कारगील युध्द परिसराला भेट देण्याची परवानगी मिळावी अशी विनंती करतात. सियाचीन हे असेच भारत पाक युद्ध झालेले ठिकाण आहे आणि तेथील प्रतिकूल हवामानात आपली सेना सर्व खडतर आव्हानांना तोंड देऊन सेवा देत आहे.

Leave a Comment