श्रीरामाचे विश्रांतीस्थळ, शंकराचे तांडवनृत्यस्थळ आहे गोरखगिरी पर्वत


पौराणिक आणि अध्यात्मिक महत्वाचे आणि तरीही पर्यटकांच्या फारसे माहितीचे नसलेले उत्तरप्रदेशच्या महोबा जवळचे एक सुंदर ठिकाण म्हणजे गोरखगिरी पर्वत. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याची या ठिकाणाची क्षमता आहे. मात्र पर्यटनाच्या दृष्टीने ते फारसे विकसित झालेले नाही.

या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम राम, माता जानकी आणि लक्ष्मण त्यांच्या वनवासासाठी काही काळ राहिले होते असे सांगितले जाते. त्यामुळे हे श्रीरामाचे विश्रांतीस्थान मानले जाते. तसेच गयासुर या राक्षसाचा वध केल्यावर शंकराने तेथेच तांडवनृत्य केले होते असेही सांगितले जाते. या गोरखगिरी बद्दल अनेक कथा सांगितल्या जातात.

राम जानकीच्या वास्तव्याने येथील भूमी पवित्र बनली असा भाविकांचा विश्वास आहे. गुरु गोरखनाथ आणि त्यांचे सातवे शिष्य दीपकनाथ यांनी येथील पहाडात तप केले आणि त्यामुळे हा पर्वत तेजस्वी बनला अशी श्रद्धा आहे. ११ व्या शतकात चंदेल शासक नान्नुक याने या ठिकाणाचे महत्व लक्षात घेऊन मदन सरोवराच्या काठी एका खडकावर तांडव नृत्य करणारी शंकराची भव्य प्रतिमा गोरखगिरीच्या पायथ्याशी स्थापन केली. त्याला शिवतांडव मंदिर असे म्हटले जाते.

येथे गजासुर नावाच्या राक्षसाचा शंकराने वध केला आणि राक्षस मारल्याचा आनंद म्हणून तांडव केले होते. ही प्रतिमा एका भव्य खडकात कोरलेली आहे. कर्मपुराणात त्याचे उल्लेख येतात. या मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. शिवरात्र, मकरसंक्रांत, श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे मोठी गर्दी होते, महोबापासून गोरखगिरी पर्वत साडेतीन किमी अंतरावर आहे.

Leave a Comment