नासा विक्रम लँडरचा शोध घेण्यात अपयशी, ऑक्टोबरमध्ये पुन्हा प्रयत्न करणार


नवी दिल्ली- अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा विक्रम लँडरचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. विक्रम लँडरचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न नासाच्या लुनार रिकॉन्सिनन्स(LOR) ऑर्बिटरने केला. पण सायंकाळच्या वेळी फोटो काढण्यात आल्यामुळे विक्रम लँडर दिसू शकले नाही, असे नासाने म्हटले आहे.

नासाने पुन्हा ऑक्टोबरमध्ये विक्रम लँडराला शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले आहे. दक्षिण ध्रुवापासून ६०० किमी दूर विक्रम लँडर पडले आहे. नासाचा लुनार आर्बिटर १७ सप्टेंबरला या भागातून गेला. त्याने त्यावेळी विक्रम लँडर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणाचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. पण नासाला त्यामध्ये अपयश आले.

दरम्यान इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी चांद्रयान २ मोहिमेचा ऑर्बिटर व्यवस्थित काम करत असून लँडरशी संपर्क साधता आला नाही, असे म्हटले आहे. विक्रम लँडरला काय अडचण आली याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असल्याची सिवन यांनी सांगितले आहे. विक्रम लँडरचा चंद्रापासून २ किमी दुर असताना नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यामुळे भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मोहीमेमध्ये अडथळा आल्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा इस्रोने सातत्याने प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही.

Leave a Comment