21 व्या वाढदिवसानिमित्त गुगलचे स्पेशल डूडल


नवी दिल्ली – आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग असलेल्या जाएंट सर्च इंजिन गुगलचा आज 21 वाढदिवस असून गुगलने जुन्या कम्प्युटरच्या थ्रो बॅक फोटोचे खास डुडल यानिमित्ताने साकारले आहे.

अनेक महत्त्वाच्या घटना, महान व्यक्तींची पुण्यतिथी, जयंती या दिवशी गुगलने डुडलद्वारे त्या व्यक्तींना आपल्या परीने मानवंदना दिली. विशेष डुडल साकारून जगातील प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस साजरे करणाऱ्या गुगलने स्वत:च्या वाढदिवसाचे देखील हटके डुडल साकारले आहे. डुडलमध्ये २० शतकामधील कम्प्युटर पाहायला मिळत आहे. २७ सप्टेंबर १९९८ अशी तारीख त्या फोटोवर देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मॉनिटर, कीबोर्ड, माउस आणि प्रिंटरही पाहायला मिळत आहे. गुगलने गेल्या वर्षी डुडलवर एक व्हिडिओ प्ले केला होता. गेल्या विस वर्षांच्या आठवणींना त्या व्हिडिओत गुगलने उजाळा दिला होता.

गुगलची स्थापना लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी केली. १९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर करत अधिकृतपणे ‘गुगल’ हे नाव ठेवले. नऊ भारतीय भाषांमध्ये आणि जगभरातील १२४ भाषांमध्ये गुगल सर्च इंजिन उपलब्ध आहे. अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यातील माउंटन व्ह्यू येथे गूगलचे मुख्यालय आहे. मागील २० वर्षांत गुगलने यशाची उत्तुंग झेप घेतली असून भारतात Google.co.in ही सेवा मराठी, हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्ध आहे.

Leave a Comment