श्रीलंकेतील सर्वात मोठ्या हत्तीचे रक्षण करणार सशस्त्र सैनिक


श्रीलंकेतील सर्वात मोठा गजराज आता सशत्र सैनिकांच्या संरक्षणाखाली असेल असे श्रीलंका सरकारने जाहीर केले आहे. ६५ वर्षीय नुन्द्नगमुवा राजा असे या हत्तीचे नाव असून त्याची उंची साडेदहा फुट आहे. श्रीलंकेतील पाळीव हत्तीमध्ये हा सर्वात उंच हत्ती असून अनेक उत्सवात सहभागी होण्यासाठी तो प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमणा करत असतो. त्यामुळे त्याची सुरक्षा वाढविण्याचा विचार सरकारने केला आहे.

हत्तीच्या मालकाने एका न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०१५ मध्ये हा हत्ती एका गर्दीच्या रस्त्यातून जात असताना एका दुचाकी वाहनाची धडक त्याला बसणार होती पण अगदी थोडक्यात हा हत्ती बचावला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर सरकारने मालकाशी संपर्क साधला आणि त्याला रस्त्यावर सुरक्षा हवी तसेच त्याच्यासोबत दोन माहूत हवेत असे सांगितले.

नुन्द्नगमुवा राजा हत्ती विशेष महत्वाचा आहे. कारण गौतम बुद्धाचे अवशेष ज्या पेटाऱ्यात ठेऊन वार्षिक उत्सवासाठी शोभायात्रा काढून मुख्य बुद्ध मंदिरात नेले जातात तो पेटारा याच हत्तीच्या पाठीवरून नेला जातो. या मुख्य मंदिरापर्यंत ९० किमीचे अंतर तो पाठीवर पेटारा घेऊन पार करतो. दरवर्षी ऑगस्ट मध्ये हा धार्मिक सोहळा पार पडतो आणि त्यात १०० हून अधिक हत्ती सहभागी होतात.

गेले काही दिवस श्रीलंकेत पाळीव हत्तीचा छळ हा मुद्दा सतत चर्चेत आहे. गेल्या मंगळवारी ७० वर्षाचा हत्ती तीकरी याचा मृत्यू झाला. धार्मिक कार्यात सहभागी होणारी ही हत्तीण भयंकर अशक्त झाली होती आणि तिचा नुसता हाडाचा सापळा राहिला होता. तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. श्रीलंकेत श्रीमंत लोक हत्ती पाळतात पण त्यांची देखभाल व्यवस्थित केली जात नाही.

Leave a Comment