३६ वर्षापूर्वी दुरावलेल्या वृद्ध जोडप्याची वृद्धाश्रमात पुनर्भेट


प्रेमाची ताकद म्हणा किंवा हिंदी सिनेमात नेहमी घडतात तसा योगायोग म्हणा अथवा चमत्कार म्हणा. एखाद्या हिंदी सिनेमाच्या कथेप्रमाणे खरी कथा केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील पुल्लुत जवळील वृद्धाश्रमात घडली. येथे ६५ वर्षापूर्वी विवाह बंधनात अडकलेले सैदू आणि सुभद्रा हे अनुक्रमे ९० व ८२ वयाचे जोडपे ३६ वर्षांच्या ताटातूटी नंतर अचानक आपल्याच गावात पुन्हा भेटले.

विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतर भेटूनही आणि दोघांचेही डोळे अधू झाले असताना त्यांनी चटकन एकमेकांना ओळखले आणि वृद्धाश्रमात आनंदाचा सागर उचंबळला. या विलक्षण योगायोगाचे सर्वांनाच नवल वाटले. समजलेल्या माहितीनुसार सैदू सुमारे ३६ वर्षापूर्वी कामाच्या शोधात उत्तर प्रदेशात गेला. सुभद्रा त्याच्या परतीची वाट पाहत राहिली मात्र सैदू आलाच नही. त्याचे काय झाले याची काहीच माहिती सुभद्रेला मिळू शकली नव्हती. सुभद्रेचे पहिले लग्न झाले होते पण तिचा पती मरण पावला होता आणि तिला दोन मुले होती.

काही वर्षांनी सुभद्रेची मुले मरण पावली आणि सुभद्रा एकटी पडली. एका मंदिरात तिने आश्रय घेतला. तेथे ती खुपच आजारी पडली तेव्हा तिला कुणीतरी दवाखान्यात दाखल केले आणि नंतर तेथून तिला या वृद्धाश्रमात आणले गेले. उत्तरप्रदेशात गेलेला सैदू नुकताच थकलेल्या अवस्थेत या वृद्धाश्रमात आला. तेव्हा नवीन कोण आले हे पाहण्यासाठी सुभद्रा तेथे आले. सैदू काहीतरी बोलला तो आवाज सुभद्रा हिला ओळखीचा वाटला तिने ताबडतोब सैदूला ओळखले.

३६ वर्षापूर्वी ते दोघे एकमेकांपासून विलग झाले आणि अश्या परिस्थितीत पुन्हा भेटले याचा आनंद तेथील सर्व लोकांनी मिठाई वाटून साजरा केला, सुभद्राने एक गाणे म्हटले आणि सैदू सुभद्रा यांनी पुढचे जीवन एकमेकांसोबत येथेच घालवायचे ठरविले आहे.

Leave a Comment