देशातील एकमेव मकरध्वज मंदिर


रामायण हा हिंदू धर्मियासाठी पवित्र आणि महत्वाचा ग्रंथ. रामायणातील अनेक पात्रे आणि त्यांच्या कथा आपण बालपणापासून ऐकत आहोत. राम, सीता, लक्ष्मण, रावण यांच्या सोबत चिरंजीव हनुमानाच्या अनेक कथा आपल्याला माहिती असतात. मात्र याशिवाय रामायणात अनेक पात्रे अशीही आहेत जी महत्वाची असूनही त्यांची फारशी माहिती आपल्याला नसते. यातील एक आहे मकरध्वज.

बजरंगबली हनुमान चिरंजीव आहेतच पण हनुमान अविवाहित मानले जातात. देशातील प्रत्येक गावात त्यांचे एकतरी मंदिर आहे. मात्र हनुमंताला एका पुत्र होता आणि त्याचे नाव होते मकरध्वज. या मकरध्वजाचे एकमेव मंदिर मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जवळ करहिया या भागातील जंगलात आहे. हे प्राचीन मंदिर असलेल्या भागात अनेक नैसर्गिक गुहा आहेत आणि त्या रामरावण युद्धाच्या प्रतिक मानल्या जातात. या ठिकाणी अनेक जलधारा असून त्याचे पाणी एका कुंडात येथे. तेथेच जवळ सात मजली अतिप्राचीन इमारत आहे त्याला सतखंड म्हणतात. येथेच पहाडात ५०० फुट उंचीवर एक विशाल गुहा असून त्याला बाबा निवास असे नाव आहे.

येथून एक झरा प्राचीन काळापासून वाहतो आहे. तो अनेक वनऔषधीमधून वाहत येतो त्यामुळे त्याचे पाणी औषधी बनले असून कोणतेही जुनाट रोग हे पाणी प्यायल्याने बरे होतात असा समज आहे.

मकरध्वज जन्माची अशी कथा आहे जेव्हा हनुमान समुद्र ओलांडून सीतेकडे पोहोचले तेव्हा त्यांना बंदी करून रावणासमोर नेले. रावणाने त्यांच्या शेपटीला चिंधी बांधून ती पेटवली तेव्हा हनुमानाने लंका जाळली. शेपटीची आग होऊ लागली तेव्हा त्यांनी ती समुद्राच्या पाण्यात विझविली. यावेळी हनुमानाच्या घामाचा एक थेंब समुद्रात पडला तो एका मगरीने गिळला आणि त्यापासून मकरध्वज जन्माला आला.

रामरावण युद्धात रावणाच्या पराभव होऊ लागला तेव्हा अहिरावणाने राम लक्ष्मणाला बेशुद्ध करून पाताळात नेले आणि तेथे बंदी बनविले. हनुमान त्याच्या शोधात पाताळात गेले तेव्हा राखणीवर असलेल्या मकरध्वजाबरोबर हनुमानानी गदा युद्ध केले तेव्हा त्याच्या पराक्रमेने प्रभावित झालेल्या हनुमानानी त्याला तू कोण असे विचारले तेव्हा त्याने त्याच्या जन्माची कथा सांगितली. तेव्हा हनुमानाने मीच तुझा पिता अशी त्याला ओळख दिली. मग मकरध्वजाच्या सूचनेनुसार हनुमानाने त्याला साखळीने बांधून घातले. राम लक्ष्मणची सुटका केली आणि अहिरावणाला ठार केले. नंतर मकरध्वजाला मोकळे करून त्याला पाताळाचे राज्य दिले.

Leave a Comment