टी-२० मध्ये सलग १८ चेंडू निर्धाव टाकण्याचा विक्रम दीप्ती शर्माच्या नावे


नवी दिल्ली – मंगळवारी भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांदरम्यान टी-२० क्रिकेट सामना रंगला होता. भारतीय महिला संघाने या सामन्यात आफ्रिकेच्या महिला संघावर ११ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत ५ सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. कर्णधार हरमनप्रित कौर आणि दीप्ती शर्मा यांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. फलंदाजीत कौरने तर गोलंदाजीत दीप्तीने महत्वाचे योगदान दिले.

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने ल्यूस हिने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताकडून कर्णधार हरमनप्रित कौर (४३), स्मृती मनधना (२१) आणि रॉड्रिक्सच्या १९ धावांच्या जोरावर भारताने निर्धारीत २० षटकात ८ बाद १३० धावा केल्या आणि आफ्रिकेच्या संघासमोर १३१ धावांचे आव्हान ठेवले.


आफ्रिकेचा या धावांचा पाठलाग करताना डाव गडगडला. आफ्रिकेला दीप्ती शर्मा, पूनम यादव, राधा यादव आणि शिखा पांडे यांनी भेदक गोलंदाजी करत ११९ धावांत गुंडाळले आणि सामना ११ धावांनी जिंकला.

दरम्यान, फिरकी गोलंदाज दीप्तीने या सामन्यात चार षटकाच्या गोलंदाजीत ८ धावा देत ३ गडी बाद केले. विशेष म्हणजे चार षटकांपैकी ३ षटके दीप्तीने निर्धाव टाकली आहेत. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ३ षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम दीप्तीच्या नावे झाला आहे. दीप्तीने आपल्या स्पेलमध्ये पहिली धाव १९ व्या चेंडूवर दिली. याच कामगिरीमुळे दीप्तीला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.

Leave a Comment