जास्तीत जास्त जमीन मिळवण्याच्या प्रयत्नात एक व्यक्तिने केले तब्बल २३ वेळा लग्न


विकासकामांसाठी ताब्यात घेतलेल्या मालमत्तांच्या बदल्यात विकसित केलेल्या क्षेत्रात जमीन मालकांना प्रती व्यक्ती ४० चौरस मीटर जागा चीनमधील लिशुई शहरात दिली जात आहे. तेथील लोक नव्याने विकसित झालेल्या या क्षेत्रात अधिकाधिक जमीन बळकावण्यासाठी नवनवीन डावपेच आखत आहेत. तर जास्तीत जास्त जमीन मिळवण्याच्या या प्रयत्नात एका व्यक्तिने तब्बल २३ वेळा लग्न केले आहे.

‘मिस्टर पॅन’ असे या व्यक्तिचे नाव आहे. या नवीन विकास योजनेअंतर्गत त्याचे घर पाडण्यात आले. त्याला व त्याच्या पत्नीला या बदल्यात ४० चौरस मीटर जागा देण्यात आली. लिशुई शहरातील जागांचे भाव नव्याने आखण्यात आलेल्या या योजनेमुळे अचानक वाढू लागले आहेत. त्याने या वाढत्या किंमतीचा फायदा घेत अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला व तिच्या बहिणीबरोबर लग्न केले. नव्या पत्नीच्या नावानेही यामुळे त्याला जागा मिळाली. त्यानंतर तिलाही घटस्फोट देऊन त्याने आणखी एका मुलीबरोबर लग्न केले आणि तिच्याही नावाने जागा मिळवली. २३ लग्नांपर्यंत लग्न आणि घटस्फोटांची ही मालिका सुरु होती. दरम्यान त्याने त्या २३ मुलींच्या नावाने मिळालेली जागाही बळकावली.

सरकारने या योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या जमीन घोटाळ्यांना रोखण्यासाठी एक चौकशी आयोग नेमला आहे. या चौकशी दरम्यान ज्या पत्त्यावर आधी केवळ दोन लोक राहत होते त्याच पत्त्याखाली तब्बल २३ लोकांना जागा मिळाल्याचे अधिकाऱ्यांना लक्षात आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. मिस्टर पॅन याने केलेला हा जमीन घोटाळा यावेळी उघडकीस आला. पोलिसांनी घोटाळा उघड झाल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली.

Leave a Comment