येथे नाखव्याच्या जाल्यात गावली सोन्याची मासोली


मच्छिमार दररोज समुद्रात जाऊन मासेमारी करतात आणि जाळ्यात सापडलेले मासे विकून उदरनिर्वाह चालवितात. बालपणीच्या कथातून मासेमाराच्या जाळ्यात सोन्याची मासोळी सापडली आणि त्याने तिला जिवंत सोडून तिच्याकडून वर मिळविला आणि तो श्रीमंत झाला अशी कथा बहुतेकांनी ऐकलेली असते. ओरिसाच्या चंद्बाली भागात धामरा समुद्र किनाऱ्यावर अशीच एक मासोळी मच्छिमारांना मिळाली असून या मासोळीमुळे ते चक्क लक्षाधीश बनले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हे मच्छिमार रोजच्याप्रमाणे मासेमारीसाठी गेले असता त्याच्या जाळ्यात १७१ किलो वजनाचा ड्रोन सागर या नावाचा दुर्मिळ मासा अडकला. त्याची विक्री किलोला ७ हजार रुपये या भावाने झाली आणि हा मासा चेन्नई मधील एका औषध उत्पादक कंपनीने ७ लाख ४९ हजार रुपयांना खरेदी केला. या भागात दीर्घकाळानंतर या जातीचा मासा सापडला असे समजते. या माश्यापासून अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात आणि ती अतिशय महाग असतात असेही सांगितले जात आहे.

यापूर्वी घोल जातीचा मासा पालघरमध्ये सापडला होता आणि त्याला साडेपाच लाख रुपये किंमत मिळाली होती. घोल माश्याची फुफ्फुसे आणि कातडीपासून सौंदर्यप्रसाधने तयार केली जातात. पूर्व आशियात मोठ्या प्रमाणावर अशी औषधे तयार होतात. या माश्याच्या कातडीपासून कोलाजम मिळते त्याचा वापर अनेक महागड्या सौंदर्यप्रसाधनात केला जातो. तसेच शस्त्रक्रियेत जखमा शिवण्यासाठी जे विरघळणारे धागे वापरले जातात ते यापासून बनतात. भारतातून हे मासे सिंगापूर, मलेशिया, जपान, इंडोनेशिया, हॉंगकॉंग या देशात निर्यात केले जातात.

Leave a Comment