ही अभिनेत्री बायोपिकमध्ये साकारणार रानू मंडल यांची व्यक्तिरेखा!


रानू मंडल यांचे संपूर्ण आयुष्य सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे बदलले, हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. बॉलिवूड अभिनेता, गायक हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटात त्यांनी ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले. रानू यांची या गाण्यानंतर बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच त्यांनी या गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावरही जादू केली. रेल्वे स्थानकांमध्ये गाणे गाण्यापासून ते बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका हा रानू मंडल यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. त्यांचा हा जीवनप्रवास ऐकून प्रेरीत झालेल्या एका चित्रपट निर्मात्याने रानू यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

रानू मंडल यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्याचा निर्णय चित्रपट निर्माता ऋषिकेश मंडलने घेतला आहे. चित्रपटातील रानू यांच्या भूमिकेसाठी दाक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्तीची ऋषिकेशने निवड केली आहे. ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा खुद्द सुदीप्ताने केला आहे. रानू मंडल बायोपिकमध्ये काम करण्याची ऑफर मला मिळाली आहे. या चित्रपटाची स्क्रीप्ट मला अद्याप मिळालेली नाही. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी चित्रपटात काम करायचे की नाही हे ठरवणार असल्याचे सुदीप्ता म्हणाली.

‘प्लॅटफॉर्म सिंगर रानू मंडल’ असे या चित्रपटाचे नाव असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रानू यांचे रेल्वे स्टेशनवर गाणे गाण्यापासून ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्तीला या चित्रपटासाठी विचारण्यात आले आहे. अद्याप तिचा होकार आलेला नाही, असे चित्रपट निर्माता ऋषिकेश म्हणाला आहे.

Leave a Comment