यावेळी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात या धनकुबेराचा आखडता हात


सुरत : प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया हे दिवाळीच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून कार किंवा फ्लॅट देत होते. पण त्यांना याबाबतीत यावर्षी हात आखडता घ्यावा लागणार आहे. यावर्षी हिरे व्यापार मंदीच्या गर्तेत आल्यामुळे यंदा बोनस देणे शक्य नसल्याची हतबलता सावजींनी व्यक्त केली.

प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांची हिऱ्यांचे शहर असलेल्या गुजरातमधील सुरतमध्ये ‘श्री हरी कृष्ण एक्स्पोर्ट’ ही कंपनी आहे. दरवर्षी दिवाळीत ढोलकिया आपल्या कर्मचाऱ्यांवर भेटवस्तूंची खैरात करतात. पण येत्या दिवाळीत वर्षानुवर्ष भरघोस बोनस घेण्याची सवय लागेलल्या कर्मचाऱ्यांची घोर निराशा होणार आहे.

ढोलकिया यांचा हिरे उद्योग डबघाईस आल्यामुळे नाइलाज झाला आहे. ढोलकियांनी 2008 पेक्षाही भीषण मंदी आल्याचे सांगत बोनस देण्यास असमर्थता दर्शवली. बऱ्याच उद्योगांना मंदीचा फटका बसलेला असताना भेटवस्तू देण्याचा खर्च मलाही परवडणार नसल्याचे ढोलकिया म्हणाले.

Leave a Comment