चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला खंडणी प्रकरणी अटक


नवी दिल्ली – धमकी देत खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. ही अटकेची कारवाई विशेष तपास टीमकडून (एसआयटी) करण्यात आली आहे. तिचा खंडणी मागत असल्यावेळचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थिनी आणि तिच्या तीन सहकाऱ्यांविरोधात पोलिसांनी खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल केला होता.

विद्यार्थिनीच्या वकिलाचा आरोप आहे की, मुलीला एसआयटीने चप्पलही घालू दिली नाही आणि जबरदस्ती ओढत रुममधून बाहेर नेत अटक केली. स्थानिक न्यायालयाने मंगळवारी विद्यार्थिनीची अटकपूर्व जामीन याचिका स्विकारली होती, पण अटकेवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता. अटकेच्या वृत्ताला उत्तर प्रदेशचे डीजीपी ओपी सिंह यांनीदेखील दुजोरा दिला आहे.

वैद्यकीय तपासणीसाठी विद्यार्थिनीला नेण्यात आले आहे. आपल्या मित्रांसोबत मिळून चिन्मयानंद यांच्याकडून पाच कोटींची खंडणी मागितल्याचा विद्यार्थिनीवर आरोप आहे. न्यायालयाने मंगळवारी विद्यार्थिनीच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेतली होती. विद्यार्थिनीच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर चिन्मयानंद यांच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला होता. जवळपास ४० मिनिटे दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्यार्थिनीची याचिका न्यायालयाने मंजूर केली होती. पीडितेच्या वकिलाने पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होणार असल्याचे सांगितले आहे.

याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयातील खंडपीठासमोर आपल्या अटकेवर स्थगिती आणण्याची मागणी विद्यार्थिनीने केली होती. पण विद्यार्थिनीला योग्य ठिकाणी याचिका दाखल करण्याचा सल्ला न्यायालयाने देत दिलासा देण्यास नकार दिला होता. तपास योग्य दिशेने सुरु आहे याची खात्री करण्याची जबाबदारी खंडपीठाकडे असून अटकेच्या प्रकरणावर स्थगिती आणण्याचा कोणताही आदेश देणे आपल्या अधिकारात येत नसल्याचे न्यायालायने सांगितले होते.

आयजी नवीन अरोडा यांनी एसआयटीने विद्यार्थिनीच्या घरातून पुरावे गोळा केले असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान विद्यार्थिनीचे तीन सहकारी संजय सिंह, सचिन सेंगर उर्फ सोनू आणि विक्रम यांनी स्वामी चिन्मयानंद यांच्याकडून पाच कोटींची खंडणी मागितल्याची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विद्यार्थिनी आणि चिन्मयानंद यांच्यासंबंधी काही धक्कादायक खुलासे एसआयटीच्या तपासात झाले आहेत. जानेवारी २०१९ ते ऑगस्ट महिन्यात आरोप करणाऱ्या विद्यार्थिनी आणि चिन्मयानंद यांच्यात एकूण २०० वेळा फोनवर बोलणे झाले असल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आले आहे.

Leave a Comment