बाल शोषणाविरोधात लढा देणाऱ्या पायल जांगिडला गेट्स फाऊंडेशनचा पुरस्कार


न्युयॉर्क – बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे देण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल गोलकिपर्स अवॉर्डस्’ कार्यक्रमात राजस्थानमध्ये बालविवाह आणि बालकामगार विरोधात अभियान चालवणाऱ्या पायल जांगिड या मुलीला ‘चेन्जमेकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

न्युयॉर्कमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मी पुरस्कार मिळाल्याने खुप आनंदी असून या पुरस्काराने पंतप्रधान मोदींनाही सन्मानित करण्यात आले आहे. ज्या प्रकारे मी माझ्या गावामध्ये बालविवाह आणि बालकामगारांचा प्रश्न सोडवला, तसे काम मला जागतिक स्तरावर करायचे असल्याचे पायलने पुरस्कार मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पायल जांगिड ही जेमतेम १५ वर्षांची मुलगी आहे. ती राजस्थानमधील हंसला या खेडेगावामध्ये इतर मुलांना बरोबर घेवून काम करते. बालविवाहाला विरोध करत या कुप्रथेविरोधात तिने स्वत: आवाज उठवला आहे. बालविवाह आणि बालकामगार थांबवण्यासाठी तिने जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. तिच्या या कामाची दखल बिल आणि मिलिंडा गेटस् फाउंडेशनने घेतली आहे.

पायलच्या कामाचे बालकांच्या हक्कासाठी काम करणारे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी यांनीही कौतुक केले आहे. ती बालकांच्या शोषणाविरोधात काम करणारी आघाडीची तरुणी असून अभिमानास्पद काम तिने केले असल्याचे असे सत्यर्थी म्हणाले. स्वच्छ भारत अभियान चालवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनाही गोलकिपर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment