गांधी आणि नरेंद्र मोदींची तुलना होऊ शकत नाही – असदुद्दीन ओवेसी


हैदराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फादर ऑफ इंडिया’ उल्लेख करण्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. ‘फादर ऑफ इंडिया’ नरेंद्र मोदी कधीच होऊ शकत नाही असे ओवेसी यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प एक अडाणी व्यक्ती असून ना भारताबद्दल काही माहिती आहे, ना त्यांना महात्मा गांधींबद्दल काही माहिती आहे. जगाबद्दल ट्रम्प यांना काहीच माहिती नसल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.

ओवेसी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांनी फादर ऑफ नेशन म्हटले आहे. ट्रम्प अशिक्षित आणि अडाणी असून गांधी आणि नरेंद्र मोदींची तुलना कधीच होऊ शकत नाही. कधीच फादर ऑफ नेशन मोदी होऊ शकत नाहीत. त्यांनी पुढे म्हटले आहे की, ट्रम्प यांना जर माहिती असते त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले नसते. राष्ट्रपिता उपाधी महात्मा गांधी यांना मिळवली होती. त्यांचा त्याग पाहून लोकांनी त्यांना ही उपाधी दिली होती. अशी उपाधी दिली जात नाही, तर ती मिळवावी लागते. भारताच्या राजकारणातील पंडित नेहरु आणि सरदार पटेलदेखील मोठी व्यक्तिमत्व होती. पण त्यांना कधीच फादर ऑफ नेशन उपाधी देण्यात आली नाही.

ओवेसी यांनी हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, एल्विस प्रेस्ली असे नरेंद्र मोदींना म्हणण्यात आले. यामध्ये तथ्य असू शकते. जे काही मी एल्विस प्रेस्लीबद्दल वाचले आहे त्यानुसार, ते खूप चांगलं गायचे आणि गर्दी जमा करायचे. आपले पंतप्रधानही चांगलं भाषण देतात आणि गर्दी गोळा करतात. त्यांच्यात हे साम्य आहे. ओवेसी यांनी यावेळी डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यासोबत डबल गेम खेळत असून समजून घेण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.

Leave a Comment