सोशल मीडियात व्हायरल होत असलेला तो दावा खोटा – रिझर्व्ह बँक


मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी अनियमिततेचा ठपका ठेवत पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) काही निर्बंध घातल्यानंतर उलट सुलट चर्चा सोशल मीडियात सुरु झाल्या आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियात व्हायरल होत असलेला काही व्यापारी बँका बंद करण्यात येत असल्याचा दावा खोटा असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

ट्विटद्वारे स्पष्टीकरण आरबीआयने देताना म्हटले, आरबीआय काही व्यापारी बँका बंद करणार असल्याचा मजकूर सोशल मीडियातील काही प्लॅटफॉर्मवरुन व्हायरल झाला असून हा दावा खोटा आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थसचिव राजीवकुमार यांनी आरबीआयची पाठराखण करताना म्हटले की, काही बँका आरबीआय बंद करणार असल्याच्या दिशाभूल करणाऱ्या काही अफवा सोशल मीडियातून पसरवण्यात आल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील कोणतीही बँक बंद करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण त्या आपली विश्वासार्हता टिकवून आहेत. उलट सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत सुधारणा घडवून आणत ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Leave a Comment