जपान मधील खास रॉक कपल


जपान हा देश मुळातच अनेक आश्चर्यानी भरलेला जादुई देश आहे. जपान मध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत आणि अनेक पर्यटक तेथे भेट देतात मात्र यापासून थोडे वेगळे असे एक खास ठिकाण जपानच्या नागासाकी भागात आहे. हे स्थळ जपानी त्यातही शिंतो धर्मियांसाठी पवित्र तीर्थस्थळ मानले जाते.

दुरवर पसरलेल्या जलाशयात मध्येच दोन खडक येथे आहेत. जपानी मध्ये खडकासाठी फुतामी असा शब्द आहे. या खडकांना मिजोता इवा म्हणजे विवाहित खडक किंवा रॉक कपल असे म्हटले जाते. हे दोन्ही खडक भाताच्या भूशश्यापासून बनविलेल्या एका बळकट दोरीने बांधले गेले आहेत. या दोरीला शिनेनावा म्हटले जाते. या दोरीचे वजन १ टन असते आणि वर्षातून तीन वेळा येथे उत्सव होतो त्यावेळी ती बदलली जाते.

जपानी लोकांसाठी हे पवित्र तीर्थस्थळ आहे. शिंतो देवतेचा वंशज इजानागी आणि जन्म जीवन, मृत्यूची देवता इजानामी याचे हे खडक प्रतिक मानले जातात. मोठा खडक म्हणजे पती तर छोटा खडक पत्नी असे मानले जाते. हा मोठा खडक ९ मीटर उंच आहे तर छोटा ४ मीटर उंच आहे. अनेक जपानी जोडपी येथे वैवाहिक आयुष्य सुखाचे व्हावे म्हणून आवर्जून भेट देतात. शिंतो धर्मियांच्या पवित्र इसे ग्रँड श्राईनजवळ हे ठिकाण आहे. शिंतो धर्मात खडक पूजा प्राचीन काळापासून केली जाते. हे खडक पवित्र, शुध्द मानले जातात आणि तेथे शिंतो देवतांचे अस्तिव असते असा समज आहे.

या ठिकाणी पहाटेच्या वेळी गेले तर आकाशात विविध रंग पसरलेले असताना या दोन खडकांच्या मधून उगवणाऱ्या सूर्याचे मनोहर दृश्य पाहता येते तर हिवाळ्यात संध्याकाळी गेल्यास या दोन खडकातून उगवणारा चंद्र पाहता येतो.

Leave a Comment