सणासुदीच्या काळात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट देणार तब्बल १.४ लाख नोकऱ्या


नवी दिल्ली – आपल्या पैकी अनेकजण सणासुदी दरम्यान ऑनलाईन शॉपिंगला पसंती देत असतात. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांच्या संख्येत इतर दिवसांच्या तुलनेत सणासुदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. ऑनलाइन शॉपिंग पोर्टल अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने याच पार्श्वभूमीवर तब्बल एक लाख ४० हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांकडून यावर्षीही सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नव्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्यातच नवनव्या ऑफर्समुळे ग्राहकांचा कलही ऑनलाइन शॉपिंगकडेच असतो. कंपन्यांवर सणासुदीच्या आणि ऑफर्सच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत असतो. आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने तो ताण कमी करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

अॅमेझॉनने ९० हजार तर फ्लिपकार्टने ५० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि अहमदाबाद या ठिकाणी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ३० टक्के अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करमअयात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment