यंदाचा फाळके पुरस्कार अमिताभ यांना मिळणार

बॉलीवूड मध्ये कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण करत असलेले महानायक बिगबी म्हणजे अमिताभ बच्चन यांना यंदा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे बिगबी त्यांच्या कारकीर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहेत आणि हा पुरस्कार सुरु झाला त्यालाही ५० वर्षे होत आहेत. दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे १९६९ पासून हा मानाचा पुरस्कार चित्रपट क्षेत्रासाठी मोठे योगदान दिलेल्या गुणी कलाकारांना दिला जात आहे.

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा त्यांच्या ट्विटर अकौंटवरून देताना अमिताभ यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना देण्यात येत असून त्याच्या नावाची निवड सर्वसंमतीने झाली. अमिताभ यांनी दोन पिढ्यांवर त्यांच्या अभिनयाचा प्रभाव पाडला आहे.

अँग्री यंग मॅन ते शेहेनशाह आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ब्लॅक, पा, पिकू चित्रपटातील भूमिकात अमिताभ यांच्या अभिनयाचे कौशल्य दिसून आले आहे. या काळात त्यांच्या अभिनयात अधिक परिपक्वता आल्याचे दिसून येथे. काही जणांना त्याच्या विनोदी भूमिका भावल्या काही जणांना त्यांचे अँग्री यंग मॅनचे रूप आवडले तर काही जणांना त्यांच्या भावूक तरल अभिनयाने भुरळ घातली.


सुपरस्टारची प्रसिद्धी मिळवत असतानाच त्यांना व्यवसायात दिवाळे जाहीर करण्याची वेळ आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा यशाची चव त्यांनी चाखली. त्यांचे आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेले आहे. सध्या बिग बी कौन बनेगा करोडपतीच्या ११ व्या सिझनचे होस्ट म्हणून काम करत आहेत. ते लवकरच नागनाथ मंजुळे यांच्या झुंड या मराठी सिनेमात दिसतील.

या पुरस्काराबद्दल अभिषेक बच्चन यांनी आनंद, अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया देताना वडिलांना अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वप्रथम देविका राणी यांना दिला गेला होता. १० लाख रुपये रोख आणि सुवर्णकमळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Leave a Comment