घरगुती छळाची शिकार बनलेल्या महिलांची अनोखी स्मृती


महिला घरगुती छळाची शिकार बनणे ही फक्त भारताची समस्या नसून जगभरातील देशात हे प्रकार घडतात. पतीने घरातच पत्नीचा जीव घेणे हा गंभीर मुद्दा आहे आणि तो म्हणावा त्याप्रमाणात लोकांसमोर येत नाही. या संदर्भात जनजागृती करण्याचा एक अनोखा प्रयत्न तुर्कस्थानची राजधानी इस्तांबुल तेथील एका भव्य इमारतीवर करण्यात आला आहे.

तुर्कस्थानातील प्रसिद्ध आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझायनरने तुर्कस्थानात एका वर्षात घरगुती हिंसेच्या शिकार बनलेल्या ४४० महिलांचे प्रतिक म्हणून येथील एका इमारतीच्या भिंतींवर ४४० शूज लावले आहेत.

नारी शक्ती आणि महिलांचे स्वातंत्र यांचे प्रतिक म्हणून वाहीत टून या आर्टिस्टने पतीच्या कडून मारल्या गेलेल्या या महिलांची आठवण जागविण्यासाठी उंच टाचेचे बुट निवडले आणि इमारतीच्या भिंतीवर त्याची आकर्षक मांडणी केली आहे. तुर्कस्तानच्या काही भागात घरातील कुणी व्यक्ती निवर्तली असेल तर त्याचे जोडे घराबाहेर ठेवण्याची प्रथा आहे.

शोक व्यक्त करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. त्यातूनच इमारतीच्या भिंतीवर बूट लावण्याची कल्पना वाहीत यांना सुचली असे समजते. इस्तंबुलची निवड या प्रतीकासाठी करण्यामागे हा संदेश अधिक जनतेपर्यंत पोहोचावा अशी इच्छा होती. हे प्रदर्शन सहा महिने सुरु ठेवले जाणार आहे.

Leave a Comment