उंच पहाडात वसलेल्या या काही सुंदर राजधान्या


उंच डोंगररांगांच्या मध्ये वसलेली निसर्गसुंदर गावे पालथी घालण्याची आवड अनेक भटक्यांना असते आणि जगभरातील भटके किंवा सभ्य भाषेत पर्यटक या शौकाला अपवाद नाहीत. त्यातून पहाडात वसलेली ही गावे त्या त्या देशाच्या राजधान्या असतील तर मग दुधात साखरच. भटकंतीसाठी बाहेर पडायचा विचार करत असलात तर मग या राज्धान्यांच्या विचार नक्की करा.

बोलिविया या देशाच्या राजधानीचे शहर ला पान हे जगातील सर्वाधिक उंचीवरचे राजधानीचे शहर आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून ११९४२ फुट उंचीवर वसले आहे. हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे तापमान व्यस्त असते मात्र खरे भटके असल्या किरकोळ गोष्टींची पर्वा करत नाहीत. अतिशय मनोरम असे हे शहर तेथील जिवंत रंगांमुळे नेहमीच भटक्यांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

अमेरिकेची गुपिते चव्हाट्यावर आणणारा विकीलिक्सचा प्रमुख ज्युलियन असंजे याला ज्या देशाने राजकीय आश्रय दिला त्या इक्वेडोरची राजधानी क्विटो समुद्रसपाटीपासून ९३५० फुट उंचीवर वसली असून ही जगातील दोन नंबरची उंचावरची राजधानी आहे. येथील ऐतिहासिक इमारती, सुंदर बगीचे, कॅफे, रेस्टॉरंटस पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

भारताचा शेजारी निसर्गसुंदर भूतानची राजधानी थीम्पु जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून ८६८८ फुट उंचीवरचे हे शहर सुंदर पहाड, नैसर्गिक सौंदर्य, सुंदर आणि गुढ बौद्ध मठ, बर्फाच्छादित शिखरे, याचबरोबर कॅफे आणि नाईटक्लब साठीही प्रसिद्ध आहे.

कोलंबियाची राजधानी बोगोटा समुद्रसपाटीपासून ८६१२ फुट उंचीवर वसली आहे. हे ठिकाण पर्यटकांच्या प्रवास बकेट लिस्टमध्ये नेहमी असते. उंच पहाडांच्या मध्येच वसलेले हे ठिकाण कला, डिझाईन आणि नाईट लाईफ साठी प्रसिद्ध आहे.

आफ्रिकेतील इथिओपिया या देशाची राजधानी अदिस अबाबा समुद्रसपाटीपासून ७७२६ फुट उंचीवर वसली आहे. आफ्रिका खंडातील हे मोठे शहर आहेच पण येथील इथिओपियन भोजन, संस्कृतीचा समृध्द वारसा या शहराला लाभला आहे. येथील बाजार उत्कृष्ट आहे आणि मुख्य म्हणजे येथील हवा वर्षभर सुंदर असते त्यामुळे सुटी मिळाली की कधीही येथे जाणे शक्य आहे.

Leave a Comment