पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार जुही चावला


बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये जूही चावलाचे देखील नाव घेतले जाते. जूहीने नव्वदच्या दशकात आलेल्या अनेक चित्रपटात आपल्या अभिनय आणि रुपाने राज्य केले आहे. कयामत से कयामत तक, डर, इश्क, हम है राही प्यार के, येस बॉस, मिस्टर अँड मिसेस खिलाडी असे अनेक हिट चित्रपट जूहीने आपल्याला दिले आहेत.

पण आता आपल्या चौकटीतून बाहेर येत जूहीने एक आव्हानात्मक भूमिका स्वीकारली. गुलाब गँग चित्रपटातील ही भूमिका होती. जूहीने या चित्रपटात पहिल्यांदाच खलनायिका भूमिका साकारली होती. रुपेरी पडद्यावरची गुणी अभिनेत्री म्हणून मिळवलेल्या प्रतिमेला छेद देत तिने खलनायिका साकारण्याचे आव्हान स्वीकारले आणि ते यशस्वीरित्या पार करुनही दाखवले.

जूही आता पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच एका वेब सिरिजमध्ये ५१ वर्षांची जूही ही दिसणार आहे. प्रेक्षकांनी आतापर्यंत मला कधीही पाहिले नसेल अशा भूमिकेत मी दिसणार आहे. ही भूमिका स्वीकारताना मी अनेकदा विचार केला. हे मला जमू शकते का? हा प्रश्न मला सतावत होता. मला या भूमिकेत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल एवढे मात्र नक्की, असे जूही म्हणाली. तूर्तास या वेब सिरिजबद्दल अधिकची माहिती जूहीने गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले आहे. पण ती लवकरच वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचा विश्वास तिने व्यक्त केला आहे.

Leave a Comment