ट्रम्प ज्या एनबीएसाठी भारतात येऊ इच्छितात ते नेमके आहे काय?


अमेरिकेच्या ह्युस्टन येथे हौडी मोदी कार्यक्रमात रविवारी उपस्थित राहिलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात होणाऱ्या पहिल्या एनबीए सामन्यासाठी भारतात येऊ शकतो काय अशी पृच्छा मोदींना केली आहे. अनेकांना हे एनबीए काय प्रकरण आहे याची माहितीही नाही. त्यामुळे ट्रम्प यानाही भारत भेटीचा मोह पाडणारे हे एनबीए म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊ.

मुंबईत पुढच्या महिन्यात म्हणजे ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी पहिल्या एनबीए मॅचेस होत आहेत. अमेरिकेत सर्वाधिक चर्चेत असलेले हे एनबीए म्हणजे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन. या सामन्यासाठी ट्रम्प भारतात खरोखर येतील वा नाही हा भाग निराळा. पण भारतात होत असलेल्या या पहिल्या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्याची इच्छा त्यांना आहे हे नक्की. ही अमेरिकेतील सर्वाधिक प्रसिद्ध मेल बास्केटबॉल लीग आहे. नॉर्थ अमेरिकेतील ३० टीम यात सहभागी होतात. या टीममध्ये जगभरातील बेस्ट प्लेअर सामील होतात.

२०१८ मध्ये एनबीएने ऑक्टोबर २०१९ मध्ये २ एनबीए टीम, इंडियाना पेसर्स आणि सेक्रेमेंटो किंग्स भारतात दोन सामने खेळतील अशी घोषणा केली होती. मुंबईत होत असलेल्या या दोन सामन्याची वेळ सायंकाळी सातची आहे. हा सामना दीड तासाचा असतो. हे दोन्ही सामने सोनी टेन वन आणि सोनी टेन ३ वर लाईव्ह दाखविले जाणार आहेत. ५ तारखेच्या सामन्याची तिकिटे प्रेक्षक खरेदी करू शकणार आहेत. हे दोन्ही सामने प्री सिझन गेम असून भारतात प्रथमच होत आहेत.

भारतात एनबीएचा प्रवेश २०११ मध्ये झाला. तेव्हा त्यांनी मुंबईत कार्यालय सुरु केले. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी एक प्रशिक्षण अकादमी भारतात सुरु केली आहे. तेथे खेळाडूना बास्केट बॉलचे प्रशिक्षण दिले जाते.

Leave a Comment