उच्च न्यायालयाने आसाराम बापूची जन्मठेपेला आव्हान देणारी याचिका फेटाळली


जोधपूर – आसाराम बापूला अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोमवारी जोधपूर उच्च न्यायालयाने या शिक्षेला आव्हान देणारी आसारामची याचिका फेटाळली आहे.

पीडित मुलगी अल्पवयीन नसल्याचा युक्तिवाद आसारामची बाजू मांडणारे वकील शिरीष गुप्ते आणि प्रदीप चौधरी यांनी केला आहे. पोस्को कायद्याच्या तरतुदीनुसार आसारामला दोषी ठरवले जाऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती विनीतकुमार माथुर यांच्या विशेष खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावताना सांगितले की, पिडितेचे वय घटनेवेळी 18 वर्षांपेक्षा कमी होते हे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २० ऑगस्ट रोजी तहकूब केली होती.

जोधपूर जवळील मनाई येथील आश्रमात ऑगस्ट 2013मध्ये एका अल्पवयीन बलात्कारप्रकरणी न्यायालयाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आसाराम बंद आहे. याप्रकरणी शिल्पी आणि शरद या अन्य दोन आरोपींनादेखील 20 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave a Comment