वैज्ञानिकानेच उपस्थित केले चांद्रयान-२च्या मिळालेल्या यशावर प्रश्नचिन्ह


नवी दिल्ली – शनिवारी चांद्रयान-२ मोहिम ९८ टक्के यशस्वी ठरली असा दावा इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी केला होता. वरिष्ठ वैज्ञानिकांनी त्यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरुन एका वैज्ञानिकाने नेतृत्व आणि रॉकेट सायन्स या विषयांबद्दल आपले विचार मांडले आहेत. असे दावे सखोल आत्मपरीक्षणाशिवाय केल्यामुळे जगासमोर आपण हसण्याचा विषय बनत असल्याचे मत एका वरिष्ठ अवकाश संशोधकाने व्यक्त केले.

जास्त वेगामुळे चांद्रयान-२ मधील विक्रम लँडरचे चंद्रावर क्रॅश लँडिंग झालेले असू शकते अशी शक्यता इस्रोमधील सूत्रांनी व्यक्त केली. या मोहिमेतील चंद्रावरील लँडिंग हा महत्वाचा टप्पा होता. रविवारी तपन मिश्रा यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली. नाव न घेता के. सिवन यांना त्यांनी टोला लगावला.

मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये नेते प्रेरणा देतात, ते मॅनेज करत नाहीत, असे म्हटले आहे. अहमदाबादच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे तपन मिश्रा संचालक होते. इस्रोच्या अध्यक्षपदी सिवन यांची निवड झाल्यानंतर या पदावरुन त्यांना हटवण्यात आले. अचानक नियमांचे पालन करण्यामध्ये वाढ झाली. वारंवार बैठका होऊ लागल्या. कागदपत्रांचा वापर वाढला तर संस्थेमध्ये नेतृत्व दुर्मिळ होत चालल्याचे ते लक्षण आहे. नवीन काही शोधण्याचा ध्यास थांबला की वेळेबरोबर संस्थेचा विकासही होत नाही असे मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

नाव न छापण्याच्या अटीवर चंद्र मोहिमेत तज्ञ असलेल्या एका अवकाश वैज्ञानिकाने मिशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. चांद्रयान-२ मोहिमेत पाच थ्रस्टरऐवजी सिंगल थ्रस्टर वापरला असता तर टेक्नॉलॉजी हाताळण्यासाठी खूप सोपी ठरली असती.

Leave a Comment