पत्नीपीडित पुरूषांचे नाशकात मुंडन आणि पिंडदान करत अनोखे आंदोलन


नाशिक – राज्यातील तमाम पत्नीपीडित पुरुषांनी नाशिकमध्ये एक आगळे-वेगळे आणि धक्कादायक आंदोलन केले आहे. रामकुंडावर राज्यातील पत्नीपीडित पुरुषांनी चक्क मुंडन आणि पिंडदान करत आंदोलन केले. हे अनोखे आंदोलन ‘वास्तव’ फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.

वयस्कर तर काही चाळिशीतले लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी या मंडळीनी आपल्याच पत्नीचा निषेध केला. आपल्याच पत्नीच्या नात्याचे पिंडदान पत्नीपीडित आणि महिला संरक्षण कायदा पीडित मंडळींनी केले. पत्नीपासून होणाऱ्या सर्व त्रासाची आहुती देऊन मुंडन केले. तसेच आमच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी केंद्रीय पुरुष आयोगाची निर्मिती व्हावी, अशी मागणी या संघटनेने केली.

फक्त महिलांनाच देशात प्रचलीत असलेल्या सर्व कायद्यांचे संरक्षण असल्याचा आरोप या पुरुषांनी केला. एकही कायदा पुरुषांसाठी नसल्याचे या पुरुषांचे म्हणणे आहे. यातील अनेकांवर त्यांच्या पत्नीने खोट्या केसेस केल्या असल्याचा दावा केला आहे. महिला कायद्याचा धाक दाखवून, पुरुषांवर प्रचंड अत्याचार करत असल्याचा आरोप या पुरुषांनी केला.

तर या पुरुषांनी केलेल्या पिंडदानाला काहीही महत्व नाही. धार्मिक परंपरेत जीवंत माणसाचे पिंडदान करता येत नाही, हे संतापाच्या भरात केलेले पिंडदान असल्याचे येथील पुरोहित सांगतात. त्यामुळे आता या पुरुषांनी केलेल्या पिंडदानामुळे खरेच पत्नीपासून त्यांना मुक्ती मिळेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment