निवृत्त करा सिक्सर किंगची जर्सी – गौतम गंभीर


नवी दिल्ली – ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहची जर्सी निवृत्त करावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि दिल्लीचा भाजप खासदार गौतम गंभीर याने केली आहे. २००७ आणि २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयात युवराजने मोलाची भूमिका बजावली असल्यामुळे युवराजचा सन्मान झाला पहिजे, असे गंभीरचे म्हणणे आहे. दरम्यान, बीसीसीआयने याआधी सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी निवृत्त केली आहे.

याबाबत बोलताना गंभीरने सांगितले की, माझ्यासाठी सप्टेंबर महिना खास असून भारताने याच महिन्यात २००७ साली टी-२० विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषक स्पर्धेत युवराजने धडाकेबाज कामगिरी केली होती. यानंतर २०११ साली भारताने जिंकलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये युवराजचा मोलाचा वाटा असल्यामुळे युवराजचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी मी बीसीसीआयकडे मागणी करेन की त्याची 12 क्रमांकाची जर्सी रिटायर करण्यात यावी.

दरम्यान, खेळाडूने निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेट बोर्ड त्या खेळाडूची जर्सी निवृत्त करते. म्हणजे, याचा अर्थ कोणताही खेळाडू या क्रमांकाची जर्सी वापरू शकत नाही. हा एकप्रकारे त्या खेळाडूचा सन्मान मानला जातो. २००७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत युवराज सिंहने आक्रमक फलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्याने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही युवराजने मोलाची भूमिका पार पाडली आहे. युवराजने १० जून २०१९ ला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. युवराजने भारताकडून ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत.

Leave a Comment