अमेरिकेत खास मोदींसाठी बनली मोदी थाळी


सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी भरल्या पोटी देशात परततील कारण त्याच्यासाठी यंदा खास पदार्थ असलेली खास मोदी थाळी तयार केली असून हे काम भारतीय वंशाच्या शेफ किरण वर्मा यांच्याकडे सोपविले गेले आहे. रविवारी ह्युस्टन येथे हौडी मोदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला असून मोदी आणि ट्रम्प यांची खास केमिस्ट्री येथे दिसून आल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या वेळी २०१४ मध्ये मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून जेव्हा अमेरिका भेटीवर गेले तेव्हा त्यांनी तेथे या दोन दिवसाच्या दौऱ्यात अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता कारण तेव्हा नवरात्र सुरु होते आणि मोदी नवरात्राचे कडक उपास करतात. यामुळे त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा थोडे खट्टू झाले होते. मोदी येणार तेव्हा त्याच्या स्वागतासाठी काय काय प्रदार्थ बनवायचे याची मोठी तयारी तेव्हा झाली होती पण मोदी काहीही खाणार नाहीत यामुळे आता त्यांना काय द्यायचे हे मोठे आव्हान ओबामा सरकारपुढे होते. अखेर मोदी यांच्यासाठी विविध फळे आणि ज्यूस यांची व्यवस्था केली गेली होती.

यंदाच्या मोदींच्या अमेरिका भेटीत ही कसर भरून काढली जात आहे. शेफ किरण वर्मा या मूळच्या ओरिसाच्या आहेत. त्या म्हणाल्या पंतप्रधानांसाठी पदार्थ बनविण्याची त्यांना पहिलीच संधी मिळाली आहे आणि पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही खास फर्माईश केलेली नाही. ते शाकाहारी आहेत याची कल्पना आहे त्यामुळे तसेच पदार्थ बनविले जात आहेत. सात दिवसांसाठी विविध पदार्थ तयार केले जात असून ही थाळी अन्य लोकांसाठी सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यात गोड पदार्थात श्रीखंड, रसमलाई, गाजर हलवा, बदाम हलवा अशी पक्वाने असतील तर तिखट पदार्थात खिचडी, कचोरी, समोसा, खांडवी, मेथी ठेपला विविध प्रकारच्या चटण्या असतील. हे सर्व पदार्थ शुद्ध तुपात बनविले जात आहेत असेही किरण यांनी सांगितले.

Leave a Comment