विक्रम लँडरच्या आयुष्याचा आज शेवटचा दिवस?


भारताच्या चांद्रमोहिमेतील चांद्रयान २ चा लँडर विक्रमशी संपर्क साधण्याच्या साऱ्या आशा आता संपुष्टात आल्या असून आज चंद्रावर दिवस मावळून शनिवारी रात्र येईल आणि विक्रम लँडरच्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस ठरेल असे सांगितले जात आहे. अर्थात इस्रोने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अद्यापि केलेली नाही. खगोल शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार १ चांद्रदिवस पृथ्वीच्या १४ दिवसांच्याबरोबर असतो. चांद्रयान दोन मोहिमेत विक्रम लँडर त्याच्या पोटातील रोव्हर प्रज्ञान याच्यासह चंद्राच्या दक्षिण धृव भागात सॉफट लँडिंग करेल अशी अपेक्षा होती पण विक्रमचे हार्ड लँडिंग झाले आणि त्यात तो चुकीच्या दिशेने कलंडला असल्याचे ऑर्बीटर कडून प्राप्त झालेल्या प्रतिमेत दिसून आले आहे.

विक्रमचा पृथ्वीशी असलेल्या संपर्क तो चंद्राच्या पृष्ठभागापासून २.४ किमी अंतरावर असताना तुटला होता मात्र नंतर त्याचे लँडिंग झाल्याचे कळल्यापासून इस्त्रोतर्फे सतत संपर्काचे प्रयत्न सुरु होते. आज चंद्रावर रात्र सुरु होईल आणि विक्रमची बॅटरी त्यामुळे चार्ज होऊ शकणार नाही. या काळात चंद्रावरचे तापमान ही लक्षणीय रित्या कमी होईल आणि इतक्या थंडीत विक्रम काम करू शकणार नाही असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment