फक्त याच मंदिरात होते विष्णूपदाची पूजा


देशात अनेक विष्णू मंदिरे आहेत आणि तेथे अतिशय सुंदर अश्या मूर्ती स्थापन केल्या गेल्या आहेत. मात्र गया येथे असलेले प्राचीन मंदिर याला अपवाद असून फक्त हेच एक असे मंदिर आहे जेथे विष्णूपदाची म्हणजे विष्णूच्या पावलाची पूजा केली जाते. भारतात काशी, गया आणि प्रयाग या मोक्ष नगरी म्हणून हिंदू धर्मात मान्यता पावलेल्या आहेत. सध्या पितृपक्ष सुरु आहे. या काळात आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून श्राद्ध पक्ष केले जातात. त्यातही गया येथे जाऊन पिंडदान केले तर पितर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतात असा हिंदूधर्मियांचा विश्वास आहे.

गया येथे या काळात प्रचंड गर्दी असते आणि येथे येणारे भाविक पितरांचे पिंडदान केल्यावर विष्णुपद दर्शन करतात. येथे विष्णूची मूर्ती नाही तर प्रचंड मोठ्या शिलाखंडावर विष्णूचे पाउल उमटलेले आहे. या पदचिन्हाचा शृंगार केला जातो. म्हणजे त्याच्यावर रक्तचंदनाच्या सहाय्याने विष्णूची गदा, पद्म, शंख, चक्र अशी चिन्हे रेखली जातात. या विष्णूपदाबद्द्द्ल अशी कथा सांगतात की, ऋषी मरीची यांची पत्नी धर्मवेत्ता हिच्या शिळेखाली देव दानव यांना हैराण करणारा राक्षस गायासुर याला स्थिर केले गेले आणि भगवान विष्णूनी त्याला तिथेच पावलाने दाबून त्याचा नाश केला. त्यावेळी विष्णूचे हे पाउल शिळेवर उमटले.

त्यामुळे देशातील गया हे असे एकमेव स्थान आहे जेथे प्रत्यक्ष विष्णूच्या चरणाचे साक्षात दर्शन होते. हे मंदिर सोन्याचा कस ज्यावर तपासला जातो त्या कसोटीच्या दगडातून बांधले गेले आहे. १०० फुटापेक्षा जास्त उंचीच्या या मंदिराच्या सभामंडपात ४४ खांब असून वर्षभर गया येथे पिंडदान विधी केले जातात. मंदिराचा कळस ५० किलो सोन्यातून बनविला गेला आहे आणि ५० किलो सोन्याचा ध्वज त्यावर आहे. मंदिरात ५० किलो चान्दीतून छत्र आणि ५० किलो चान्दीतून अष्टपहल बनविले गेले असून त्याखाली विष्णूंच्या पादुका आहेत. गर्भगृहाचे दार चांदीचे असून विष्णूपद ४० सेंटीमीटर लांबीचे आहे.

मंदिर फाल्गु नदीच्या पश्चिम काठावर असून या नदीच्या पूर्व काठावर सीताकुंड आहे. येथे सीतेने रामासह दशरथाचे पिंडदान केले होते असे सांगितले जाते.

Leave a Comment