लालबागचा राजासह इतर गणेश मंडळांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस


मुंबई – अनेकांनी मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आवाज उठविण्यास सुरुवात केल्यानंतर आता बृह्नमुंबई महानगर पालिकेने या संदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गणेश मंडळाना मुंबई महानगरपालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून, या मंडळांनी गणेशोत्सवाच्या काळात मंडप उभारण्यासाठी खोदलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश या नोटिसीतून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजा मंडळालाही नोटीस बजावली आहे. तब्बल २०० खड्डे या मंडळाने खोदले होते, अशी माहिती महानगरपालिकेने दिली.

हे खड्डे येत्या २३ सप्टेंबरच्या आत मंडळांनी बुजविणे आवश्यक आहे. मंडळांनी जर दिलेल्या मुदतीत खड्डे बुजविले नाही. तर प्रत्येक मंडळाकडून प्रत्येक खड्ड्यासाठी २००० रुपये दंड आकारला जाणार आहे, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले.

लालबागचा राजा मंडळासंदर्भात महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेला या मंडळाने ३० लाख रुपये देणे आहे. गेल्या गणेशोत्सवावेळी महानगरपालिकेच्या अखत्यारितील गोष्टीचे केलेले नुकसान आणि इतर कारणांमुळे हा दंड लावण्यात आला होता. महापालिकेचे अधिकारी म्हणाले की, लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही सध्या चर्चा करीत असून, त्यांच्याकडील देय रक्कम कसे घेता येईल, यावर मार्ग काढीत आहोत. आम्हाला अशी आशा आहे की पुढच्या आठवड्यात मंडळ यंदाच्या वर्षी तयार केलेले खड्डे नक्की बुजवेल.

याबाबत लालबागचा राजा मंडळाचे मानद् सचिव सुधीर साळवी म्हणाले, महानगरपालिका प्रशासन जर ही रक्कम ३० लाख रुपये असल्याचे सांगत असली, तरी ते आम्हाला मान्य नाही. आम्ही महानगरपालिकेचे सर्व नियम पाळत आलो आहोत. गणेशोत्सवाच्या काळात खोदलेले सर्व खड्डे आम्ही दिलेल्या वेळेत नक्की बुजवू, असेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

Leave a Comment