वाजले विधानसभा निवडणुकीचे बिगुल, 21ला मतदान तर 24 ऑक्टोबरला मोजणी


नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणूक दिवाळीपूर्वीच पार पडणार असून महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. आज दिल्लीत याबाबतची घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान होईल. दोन्ही राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदार असून 1.8 लाख ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया 2 नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.

असा आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम
* अर्ज भरण्याची तारीख : 27 सप्टेंबर
* अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर
* अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर
* अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर
* मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर
* निकाल : 24 ऑक्टोबर

Leave a Comment