६५ हजाराच्या स्कुटरवर आकाराला १ लाख दंड


देशात नवीन वाहन नियम लागू झाल्यापासून २० दिवसात लाखो रुपयांचा दंड वसूल झाल्याची आकडेवारी समोर येत असताना ओरिसात एक मजेशीर घटना घडली आहे. येथे डीलरकडून नवीन स्कुटर घेऊन १५ दिवस होत नाहीत तोपर्यंत स्कूटरच्या किमतीपेक्षा अधिक दंड आकाराला गेला असून तो डीलरला भरावा लागणार आहे.

झाले असे की ओरिसाची राजधानी भुवनेश्वर येथील एका डीलरकडून एका ग्राहकाने २८ ऑगस्ट रोजी अॅक्टिव्हा स्कुटरची डिलीव्हरी घेतली. त्यासाठी त्याने ६५ हजार रुपये किंमत चुकती केली. १२ सप्टेंबर रोजी एका चेक पोस्टवर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही गाडी अडविली कारण त्याला रजिस्ट्रेशन नंबर नव्हता. आरटीओ ने डीलरशी संपर्क साधून विना रजिस्ट्रेशन नंबर गाडी दिल्याबद्दल त्याला १ लाखाचा दंड ठोठावला शिवाय त्याचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले. कोणतीही कागदपत्रे नसताना स्कुटरची डिलीव्हरी दिलीच कशी असा जाब डीलरला विचारला गेला.

वास्तविक डीलरने नवीन वाहने रजिस्ट्रेशन प्लेट, विमा आणि पीयूसी सह ग्राहकाला द्यायची हा नियम पूर्वीपासूनचा आहे पण नवीन नियमानुसार या गुन्ह्यासाठीच्या दंडात वाढ झाली आहे. त्यामुळे १ लाखाचा दंड आकाराला गेल्याचे समजते.