१८ किमीच्या प्रवासासाठी रिक्षा चालकाने घेतले तब्बल ४,३०० रुपये भाडे


पुणे: एका इंजिनिअरला बंगळुरुवरुन पुण्याला येणे खूपच महागात पडले आहे. आपल्याला अनेकदा दुसऱ्या शहरातून एखाद्या नव्या शहरात आल्याने नागरिकांची लूट होत असल्याचे ऐकायला मिळते. पण पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या बंगळुरुच्या व्यक्तीसोबत असे काही घडले आहे की, तो ते आयुष्यभर विसरु शकत नाही. या व्यक्तीने पुण्यात एका ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा केली, त्याला ज्यासाठी तब्बल ४३०० रुपये भाडे मोजावे लागले आणि ते देखील फक्त १८ किमी प्रवासासाठी.

या संदर्भात एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील एका रिक्षा चालकाने बंगळुरुहून आलेल्या एका इंजिनिअरला गंडा घातला आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महागडा रिक्षाचा प्रवास ठरला आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली. बंगळुरुहून कामानिमित्त पुण्यात हा इंजिनिअर आला होता. पुण्यातील कटराजपासून येरवडापर्यंतच्या १८ किमीच्या प्रवासासाठी या व्यक्तीला तब्बल ४३०० रुपये द्यावे लागले.

त्या इंजिनिअरने येरवडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, त्या व्यक्तीला बुधवारी पहाटे ५ वाजता कटराज-देहू रोड बायपासवर बंगळुरुहून आलेल्या एका बसने सोडले. पुण्यात पहिल्यांदाच आल्याने त्या व्यक्तीने ऑनलाइन कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्यावेळी एकही कॅब मिळाली नाही. त्यावेळीच एक रिक्षा तिथून जात असल्याचे त्याला दिसले. रिक्षामध्ये यावेळी आणखी एक व्यक्ती बसला होता.

त्या व्यक्तीने याबाबत अधिक माहिती देताना असे सांगितले की, दारुच्या नशेत रिक्षा चालक असल्यासारखा वाटला. पण दुसरा कोणता पर्याय नसल्याने त्यानेही रिक्षातून जाणेच सोयीस्कर समजले. रिक्षा चालकाने यावेळी या तरुणाला असे सांगितले की, मीटरप्रमाणे जेवढे भाडे होईल तेवढे द्यावे. पण त्याकडे तरुणाने लक्ष दिले नाही की, रिक्षा चालकाने मीटर शून्यावर सेट केले की नाही ते. तो जेव्हा येरवड्याला पोहचला त्यावेळी रिक्षाचालकाने त्याच्याकडून तब्बल ४३०० रुपये उकळले. त्याने या गोष्टीला जेव्हा विरोध केला तेव्हा रिक्षा चालकाने त्याला असे सांगितले की, ६०० रुपये शहरात प्रवेश करण्याचे आणि ६०० रुपये शहरातून बाहेर पडण्याचे. त्यानंतर बाकी सर्व भाडे आहे. तरुणाने या सर्व प्रकारानंतर रिक्षा चालकाविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार ज्यावेळी घडला तेव्हा पूर्णपणे उजाडले नव्हते. तसेच नवे शहर असल्याने त्याला थोडी भीती देखील वाटत होती. यामुळे त्याने संपूर्ण पैसे रिक्षाचालकाला दिले. पण यावेळी त्याने एक गोष्ट केली ती म्हणजे त्या रिक्षाचा नंबर टिपला. त्यानंतर त्याने पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रारही नोंदवली. याबाबत येरवडा पोलिसांनी अशी माहिती दिली की, आम्ही संबंधित पोलीस ठाण्यात याची कॉपी पाठवली आहे. तसेच संशयित रिक्षा चालकाचा तपास सुरु करण्यात आला असून त्याच्याविरोधात कठोर कारवाई देखील केली जाईल.

Leave a Comment