मनपसंद डिझाईनसह घ्या कॉफीचा आस्वाद


मित्रमंडळीबरोबर गप्पा, सगेसोयाऱ्यांबरोबरचा क्वालिटी टाईम किंवा मस्त पावसाळी वातावरण गरमागरम कॉफीसोबत एन्जॉय करणे हे आयुष्यातील सुखाच्या क्षणांपैकी काही क्षण. मग ती कॅपिचीनो असो किंवा मोचाक्सिनो असो किंवा आपली पारंपारिक वेलदोडा, जायफळ घालून केलेली दुधातील दाट कॉफी असो. अश्या वेळी कॉफीचा नुसता वाससुद्धा आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो. कॉफीसोबत अनेक नवे जुने किस्से सांगितले जातात, ऐकले जातात. आजकाल कॉफीसोबतच्या या आठवणी आणखी मधुर आणि सुंदर बनविण्यासाठी बाजारात दुधातील कॉफीवर खास डिझाईन बनवून त्याचा आस्वाद घेण्याचा ट्रेंड वाढतो आहे.

यात कॉफी कपात ओतल्यावर तिच्यावर विभिन्न चित्रे काढली जातात आणि आपल्या अनेकप्रकारच्या भावना शब्दाविनाच पोहोचविणे शक्य होते. म्हणजे समजा एखाद्याला तुमच्या हृदयात जागे झालेले त्या व्यक्तीबद्दलचे प्रेम किंवा नाजूक भावना व्यक्त करायच्या आहेत पण बोलू शकत नाही आणि अश्यावेळी कॉफीवर सुंदर प्रकारे रेखाटले गेलेले हृदय किंवा दिल हे काम करेल.

एखाद्या खास व्यक्तीला मेसेज करायचा आहे पण एसएमएस नको असेल तर कॉफीच्या कपावर असा मेसेज रेखाटून मिळेल. सुंदर चवीच्या कॉफीबरोबर आलेला हा मेसेज योग्य तो संदेश देईलच. मग ती हृदयाची बात असेल, आपल्या जवळच्या व्यक्तीला डेडिकेट केलेला मजकूर असेल किंवा एखादा फिल्मी डायलॉगही असेल.

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची अवस्था दिल तो बच्चा है जी अशीच असते. अश्यावेळी कॉफीच्या कपात रेखलेली कार्टून डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या सहवासातील व्यक्तीला नक्कीच आनंद देईल. एखादा सुंदर मुखडा सुद्धा कॉफीवर रेखाटता येईल. अर्थात यासाठी नेहमीच्या कॉफीला पडणाऱ्या किमतीपेक्षा खिसा थोडा जादा हलका करावा लागेल.

Leave a Comment