रेल्वे न्यायालयात सनी देओल, करिष्मा कपूर आरोपी


बॉलीवूड अभिनेता आणि खासदार सनी देओल आणि अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्यावर १९९७ साली विनाकारण रेल्वे साखळी ओढून रेल्वे थांबविल्याप्रकरणी रेल्वे न्यायालयात आरोप ठेवले गेले आहेत. बजरंग चित्रपटाच्या ट्रेन २४१३ ए अपलिंक गाडीत होत असलेल्या शुटींग दरम्यान ही घटना घडली होती. या दोन्ही कलाकारांनी रेल्वेने दाखल केलेल्या दाव्याला सत्र न्यायालयात आव्हान दिले असून त्याची सुनावणी २४ सप्टेंबरला होणार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार १९९७ मध्ये चित्रपट शुटींग दरम्यान सनी आणि करिष्मा यांनी रेल्वे डब्यातील साखळी काहीही कारण नसताना खेचली आणि त्यामुळे ही गाडी २५ मिनिटे लेट झाली होती. विनाकारण रेल्वे डब्यातील साखळी ओढणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे त्यावेळी या दोघांसह स्टंटमन टिनू वर्मा आणि सतीश शहा यानाही आरोपी केले गेले होते. त्याचा दावा २००९ मध्ये रेल्वे न्यायालयात दाखल करण्यात आला मात्र त्याविरोधात या कलाकारांचे वकील ए.के. जैन यांनी २०१० मध्ये सत्र न्यायालयात धाव घेतली आणि रेल्वेने ठेवलेले आरोप सत्र न्यायालयात फेटाळण्यात आले होते. मात्र त्यावेळी टिनू आणि सतीश शहा यांनी अपील केले नव्हते. आता रेल्वे न्यायालयाने पुन्हा या कलाकारांवर आरोप ठेवला असून १७ सप्टेंबरला दावा दाखल केला आहे.