स्वतःचा तोल सांभाळणारी स्कुटर


दुचाकी वाहनांना अनेकांची पसंती असते. विशेषतः शहरात आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणाऱ्या गर्दीच्या रस्त्यावर दुचाकी खूपच सोयीची पडते. वाहतूक कोंडी असली तरी दुचाकी सहज त्यातून मार्ग काढू शकते हे त्याचे मुख्य कारण. पण दुचाकी वाहनाच्या अपघातांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यात दुचाकीवर कंट्रोल न राहणे, गाडी स्किड होणे ही मुख्य कारणे आहेत. आयआयटी मधून पदवी मिळविलेल्या तरुणांनी लायगर मोबिलिटी (LIGER) नावाने एक स्टार्टअप सुरु केली असून या अडचणीवर मार्ग काढणारी स्कुटर तयार केली आहे.

ही स्कुटर सर्वसामान्य लोकांचा दुचाकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन मुळातून बदलेल असा कंपनीचा दावा आहे. कारण ही स्कुटर स्वतःचा तोल स्वतः सांभाळेल. या स्कुटरला व्हॉईस कमांड देता येते त्यासाठी एक खास डिव्हाईस त्यात बसविले गेले आहे. सध्या या स्कुटरचा प्रोटोटाईप बनविला गेला असून लवकरच त्याचे उत्पादन सुरु होईल. या स्कुटरचा एक व्हिडीओ रिलीज केला गेला आहे. त्यात स्कूटरला रिव्हर्स कमांड, पार्किंग स्लॉट मधून बाहेर येण्यासाठी दिलेली कमांड आणि त्यानुसार स्कुटर आपोआप पार्किंग बाहेर आलेली दिसत आहे. विशेष म्हणजे नुसती व्हॉइस कमांड देऊन पार्किंग स्लॉटमधून आपोआप बाहेर येणारे वाहन भारतात अजूनतरी बनलेले नही.

ही स्कुटर रायडरला वेगळी कंट्रोल करावी लागत नाही त्यामुळे ज्याने कधीही दुचाकी चालविलेली नाही त्यालाही ही स्कुटर सहज चालविता येणार आहे. इतकेच काय ही सेल्फ बॅलन्स्ड स्कुटर असल्याने रस्त्यात स्कुटर थांबविल्यावर चालकाला पाय जमिनीवर टेकविण्याची गरज नाही आणि तरीही चालक स्कुटरवरून पडण्याची भीती नाही.

ही स्कुटर बनविण्यासाठी दोन वर्षे संशोधन केले गेले आहे. मात्र यात बसविल्या गेलेल्या जास्तीच्या डिव्हाईस मुळे तिची किंमत नेहमीच्या स्कुटरपेक्षा १० टक्के जास्त असेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment