धोनीला संघाने आता सन्मानाने निरोप द्यावा : सुनिल गावस्कर


मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार व सध्याचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीबाबत माजी कर्णधार सुनिल गावस्‍कर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले. त्यांच्यामते, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता धोनीचा काळ संपला असून आता त्याला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या माजी कर्णधाराचा विचार सोडून संघाने पुढचा विचार करायला हवा. टीम मॅनेजमेंटला आता धोनीच्या नंतरचा विचार करायला हवा, असा सल्ला गावस्कर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवड समितीला दिला.

आता आपल्याला पुढील विचार करायला हवा. आता धोनी संघात बसत नाही. माझ्या संघात तरी तो बसत नाही. तुम्ही जर टी-20 विश्वचषकाबाबत बोलत आहात, तर मी ऋषभ पंतचा विचार करेन. मी संजू सॅमसनबाबत विचार करेन. जर आपण टी-20 विश्वचषकबाबत विचार करत आहोत, तर मी तरुण खेळाडुंबाबत विचार करेन. कारण, आता आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. माझ्या मनात धोनीबाबत आदर आहेच आणि मला वाटते की त्याला संघातून बाहेर करण्याआधी चांगल्यापद्धतीने निरोप दिला जावा, असे सुनिल गावस्कर म्हणाले.

धोनीची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी-20 मालिकेसाठीही निवड करण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घ्यायची आहे, हे धोनीला माहीत आहे, असे मुख्य निवडकर्ता एम.एस.के. प्रसाद यांनी सागितले होते. तर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीनेही निवृत्ती घेण्याचा निर्णय धोनीवर सोडला आहे.

Leave a Comment