पूर्वघाटातील मनोरम नगरी लेपाक्षी


पावसाळा थोडा सरता झाला आहे. हवा खुशगवार बनली आहे आणि आकाशात तुरळक ढग तरंगत आहेत. अश्यावेळी प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. भारतात पर्यटनासाठी शेकड्यांनी ठिकाणे आहे. पण एखाद्या चित्रपटात दिसावा असा निसर्ग, हिरव्यागार शेतातून दरवळणारा नव्या पिकाचा वास आणि शेताच्या गालीच्यात मध्येच दिसणारा एखादा डोंगराचा सुळका अश्या प्रदेशाला भेट द्यायची असले तर आंध्रप्रदेशातील लेपाक्षीचा विचार नक्की करा.

भारतात पश्चिम घाटाचे सौंदर्य नेहमीच चर्चेत असते पण आपला पूर्व घाट सुद्धा तितकाच मनोरम आहे. ग्रामीण भारताचे नितांतसुंदर दर्शन येथे घडते. आंध्रप्रदेशाच्या रायलसीमा भागातील लेपाक्षी हे ठिकाण कर्नुल, कडप्पा, चित्तूरसह कर्नाटकच्या काही भागाला जोडलेले आहे. येथे ग्रॅनाईटचे पहाड आहेत आणि या दिवसात शेंगदाणे, मका आणि भात याच्या पिकांनी येथे एकाच दंगा मांडलेला दिसेल.

लेपाक्षी या ठिकाणाचा संबंध रामायण काळाशी जोडलेला आहे. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा तो या भागावरून जात असताना जटायूने त्याला इथेच अडविले पण रावणाने जटायूचे पंख कापून त्याला जखमी केले. राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत येथे आले तेव्हा जटायूने त्यांना सीतेला रावणाने पळविल्याची माहिती दिली. जखमी जटायूला रामाने ले पक्षी म्हणजे पक्ष्या उठ असे म्हटले त्यावरून या ठिकाणाचे नाव लेपक्षी असे पडले त्याचे कालांतराने लेपाक्षी झाले असे सांगतात,

विजयनगर साम्राज्यात हे व्यापाराचे मोठे केंद्र होते आणि तीर्थस्थळ म्हणूनही प्रसिद्ध होते. येथे अनेक सुंदर भव्य मंदिरे आहेत आणि हातमाग कपड्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे. लेपाक्षी प्रिंटच्या साड्या व अन्य कपडे येथे प्रसिद्ध आहेत.