मनमोहन सिंग यांच्याबाबत इंग्लंडच्या माजी पंतप्रधानांचा मोठा खुलासा


लंडन: आपल्या ‘फॉर द रिकॉर्ड’ या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांच्याबाबत इंग्लंडचे (ब्रिटन) माजी पंतप्रधान डेविड कॅमरन यांनी एक मोठा खुलासा केला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर सैन्य कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा कॅमरन यांनी केला. मनमोहन सिंग यांच्याविषयीच्या अनेक आठवणी त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केल्या आहेत.

2010 ते 2016 मधील अनेक घटनांबाबत महत्त्वाचे खुलासे कॅमरन यांनी आपल्या ‘फॉर द रिकॉर्ड’ या पुस्तकात केले आहेत. डेविड कॅमरन म्हणाले, पुन्हा मुंबईसारखा हल्ला झाला तर नाईलाजाने आम्हाला पाकिस्तानविरुद्ध सैन्य कारवाई करावी लागेल, असे स्पष्ट मत त्यावेळी मनमोहन सिंग यांनी नोंदवले होते.

मनमोहन सिंग यांना कॅमरन यांनी ‘संत पुरुष’ संबोधत लिहिले, माझे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत संबंध चांगले होते. ते एक संत पुरुष आहेत. पण भारतावर संकट आल्यावर ते तेवढेच कठोर भूमिका देखील घ्यायचे. त्यांनी मला भारतातील एका दौऱ्यात म्हटले होते, मुंबईत 2008 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे पुन्हा हल्ला झाला, तर भारत पाकिस्तानविरोधात थेट सैन्य कारवाई करेल.

मनमोहन सिंग यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी देखील डेविड कॅमरन यांनी खुलासा केला. मोदींसोबतही कॅमरन यांचे चांगले संबंध होते. वेम्बले स्टेडियमवर झालेल्या सभेत मोदींनी कॅमरन यांची गळाभेट घेतली होती. त्याचाही उल्लेख कॅमरन यांनी आपल्या पुस्तकात केला.

कॅमरन यांनी लिहिले, मोदी यांच्या भाषणाआधी मी 60 हजार जनसमुहाला एक दिवस भारतीय वंशाचा व्यक्ती ब्रिटनचा पंतप्रधान होईल, अशी आशा व्यक्त केली होती. त्याला उपस्थित लोकांनी अद्भूत प्रतिसाद देत होकार दिला होता. त्यानंतर मोदी मंचावर आल्यानंतर आम्ही गळाभेट घेतली. त्यावेळी ब्रिटनने जगाला खुल्या मनाने स्वागताचा संकेत दिला होता.