ईव्हीएमवरच होणार विधानसभेची निवडणूक – मुख्य निवडणूक आयुक्त


मुंबई – बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या ईव्हीएमवरच होणार असून आम्ही यात त्यासाठी अनेक प्रकारचे बदल करणार असल्याची माहिती दिली. तसेच बॅलेट पेपर हे आता इतिहासजमा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उमेदवारांना राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ही २८ लाख आहे. आता त्यात वाढ करण्यासाठी काही पक्षाकडून मागणी करण्यात आली आहे. पण त्यात वाढ केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात आता कागदी मतपत्रिका इतिहासजमा झाल्या आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातूनच येथून पुढे मतदान होणार आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड अशक्य आहे. काही यंत्रात बिघाड होऊ शकतो. पण ईव्हीएमच्या सत्यतेबाबत कोणालाही शंका घेता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. ईव्हीएम हे परिपूर्ण यंत्र असून आता कोणालाही मागे जाता येणार नसल्याचे अरोरा म्हणाले.

तसेच सांगली-कोल्हापूर या जिल्ह्यात सुरू असेलल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निवडणूक आचारसंहितेचा कोणताही प्रश्न येणार नाही, यासाठी अत्यावश्यक सेवांची यात तरतदू केली जाईल, असेही अरोरा म्हणाले. काँग्रेसकडून राज्यात असलेल्या बोगस मतदारांच्या संदर्भात तक्रार आली आहे. त्यावर काय कारवाई करण्यात आली याची माहिती आम्ही देणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्यात महत्वाच्या आणि संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. तर राज्यातील पोलीस आणि इतर बलासोबत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातील पोलीस आदी बल या निवडणुकीत तैनात केले जाणार आहे.

दिल्लीतून महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनिल अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत त्यांनी बुधवारी सविस्तर चर्चा केली.

Leave a Comment